राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ दौंड शहरातील विविध संघटनांनी संविधान सन्मान रॅली काढली. यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, तर केडगाव स्टेशन येथे भीम सैनिकांनी अमित शहा चे पोस्टर दहन करून निषेध नोंदवला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा देशभरात निषेध केला जात आहे. काॅग्रेससह भाजप विरोधी पक्षांनी अमित शहा घेरले आहे. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
दौंड शहरात शनिवारी (दि २१) सकाळी शहरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली पोलीस ठाण्यासमोर असलेल्या संविधान चौकात आली.
यावेळी संविधान प्रेमींनी शहा यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहा यांनी देशातील संविधानी प्रेमी जनतेची माफी मागावी. त्यांनी त्वरित गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. भाजप हा शहा यांची पाठराखण करीत असुन भाजपला पुन्हा या देशात मनुस्मृती लागु करायची आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.
या रॅलीमध्ये राजकीय पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी, महिला संविधान प्रेमी तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच केडगाव स्टेशन येथे ही भीमसैनिकांनी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टरचे चौकात दहन केले. याप्रसंगी केडगाव पोलीसांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.











