रायगड : महान्यूज लाईव्ह
माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात पर्पल ट्रॅव्हल्सची लग्नासाठी भाडोत्री घेतलेली खाजगी बस (क्रमांक MH14-GU-3405) अपघात होऊन पलटी झाली. पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंबीयांचे महाड येथील बिरवाडी येथे लग्न समारंभ असल्याने ही बस तिकडे निघाली होती. तामिनी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी कोसळली यामध्ये पाच पुरुष व तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर 25 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत हा अपघात आज सकाळी १० वा. च्या सुमारास झाला. ही बस पुण्याहून माणगांवकडे येत होती. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.बसमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. २७ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले.
या अपघातात संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव व एक अनोळखी पुरुष ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही अशा पाच जणांचा मृत्यू झाला. ही माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घर्गे यांनी दिली आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले आहे.











