इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कुटुंबासाठी स्वयंपाकघर बाग उभी करण्यासाठी स्वस्त, सोपी आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पिठेवाडी गावात नुकतेच आयोजित करण्यात आले. बारामती येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हायड्रोपोनिक्सच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि उपयोग स्पष्ट करून हे प्रात्यक्षिक सादर केले.
हायड्रोपोनिक्स ही मातीविना पीक घेण्याची एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे, ज्यामुळे पाणी, वेळ आणि जागेची बचत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी घरी तयार करता येणाऱ्या सोप्या हायड्रोपोनिक यंत्रणेची माहिती दिली. घरातील निरुपयोगी बॉटल्स, पाईप्स, पंप्स, पोषणमिश्रण, आणि सूर्यप्रकाशाचा योग्य उपयोग करून ही यंत्रणा कशी उभारावी, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गावकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाला चांगला प्रतिसाद दिला. स्वयंपाकघरासाठी लागणारी कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक यांसारखी पाने आणि भाज्या हायड्रोपोनिक्सच्या साहाय्याने वर्षभर कशा पिकवता येतील, यावरही चर्चा झाली. या उपक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या मागणीवरून करण्यात आले होते. यामागे लोकांना घरच्या घरी शुद्ध आणि पौष्टिक भाजीपाला उपलब्ध करून देणे, तसेच जलस्रोतांची बचत करणे हा उद्देश आहे.
यावेळी गावचे सरपंच पप्पू जानकर, उपसरपंच वैभव व्हनखडे, कृषीसेवक अंजली जगताप, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कृषीदुतांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे यांनी मार्गदर्शन केले.











