जळगाव : महान्यूज लाईव्ह
घटना फक्त दोन सरकारी कर्मचाऱ्यांमधील नाही.. लुटालुटीच्या या महामारीत सारेच कसे साव वाटतात आणि एकमेकांना लुबाडतात, याची ही कहाणी! कुंपणच शेत खात या म्हणीप्रमाणे पोलिसानेच कायदा मोडत एका ग्रामसेवकाला लुटले, तेही तब्बल 16 लाखांना! पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयात गेल्यावर ग्रामसेवकाचे पैसे उभारण्याचा डाव उघड झाला आणि फौजदारासह पाच जणांना अटक झाली.
या घटनेमध्ये फौजदार प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे गावाला ज्ञान दाखवणारा ग्रामसेवकच यात लुटला गेला होता. पैसे तिप्पट करून देतो म्हणून ग्रामसेवकाला लुटण्याची ही घटना आहे.
या घटनेत ज्याची फसवणूक झाली त्या ग्रामसेवकाचं नाव आहे विकास पाटील! पाचोरा येथे राहणाऱ्या व खडक देवळा या गावात ग्रामविकास अधिकारी असलेल्या विकास पाटीलची सचिन धुमाळ याच्याबरोबर क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने मैत्री झाली होती. धुमाळने ग्रामसेवक विकास पाटील यांना माझ्याकडे पैसे तिप्पट करून द्यायला माणूस आल्याचे सांगितले आणि विश्वास संपादन केला. त्यावरून विकास पाटील देखील ही गुंतवणूक करण्यासाठी तयार झाले. दरम्यान धुमाळच्या सांगण्यावरून विकास पाटील 16 लाख रुपये घेऊन आले. ते पैसे घेण्यासाठी निलेश आहिरे तेथे आला.
निलेश अहिरे पैसे घेत असतानाच तिथे तीन पोलीस आले. त्यांनी पैशाच्या बॅगेसह निलेश अहिरेला ताब्यात घेतलं. धुमाळ याने ग्रामसेवक पाटील याला सांगितले की, पोलीस तर पैसे घेऊन गेलेत. आता काय करायचं? पैशाचं जर काय सांगायचं म्हटलं, तर आपल्यावरच कारवाई करतील, त्यापेक्षा आपण गप्प बसू असे विकास पाटील यांना सांगितले, परंतु विकास पाटील यांना संशय आला.
विकास पाटील यांनी आपली कुठेतरी फसवणूक झाल्याचे वाटल्याने ते जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथे गेल्यावर त्यांचा संशय आणखी बळावला. हा सगळा प्रकार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितला आणि चक्रे फिरली. हा सगळा प्रकार पोलीस खात्यात कर्मचारी असलेल्या योगेश शेळके याने घडवून आणला होता आणि फौजदार प्रकाश मेढे याच्याशी व दिनेश भोई याच्याशी संगनमत करून हे पैसे लुबाडण्याचा हा संपूर्ण डाव होता हे उघडकीस आले.











