बारामती : महान्यूज लाईव्ह
९ डिसेंबर रोजी पहाटेच्या तीन वाजता बारामती तालुक्याच्या हद्दीतील शेवटच्या गावात जैनकवाडीच्या घाटाच्या पहिल्या वळणावर भिगवणकडे निघालेली टाटा हॅरीहर पलटली आणि झालेल्या भीषण अपघातात दोन शिकाऊ पायलटचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चेस्ता बिष्णोई या युवती पायलटचा पुण्यातील खासगी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार चेस्ता गेली 10 दिवस दवाखान्यामध्ये होती. ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. तिचे दोन्ही डोळे, किडन्या, हृदयासह आठ अवयव दान करण्यात आले आहेत. तिच्या मृत्यूने या अपघातातील मृतांची संख्या तीन वर पोचली आहे. दरम्यान या अपघातातील चौथ्या शिकाऊ पायलटची प्रकृती स्थिर झाली असून उपचार यशस्वी झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
९ डिसेंबरच्या पहाटे तीनच्या दरम्यान बारामतीतील पायलट ट्रेनिंग संस्थेत शिकणारे कृष्णाशू मंगल सिंग, दक्षू विष्णू शर्मा, चेश्ता ज्योतीप्रकाश बिष्णोई व आदित्य जयदास कणसे हे जण भिगवणनजिकच्या उजनी पाणवट्यावर निघाले होते. कृष्णाशू हा गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी दक्षू शर्मा तर पाठीमागे चेश्ता व आदित्य बसले होते. गाडी जैनकवाडी येथील घाटाच्या पहिल्या वळणावर आली, तेव्हा कृष्णाशू याचे टाटा हॅरीहर कंपनीच्या गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी अगोदर रस्त्याकडेच्या झाडाला धडकून लोखंडी पाईपलाईनवर पलटी झाली.
हा अपघात एवढी भीषण होता की, गाडी तब्बल १४० फूट अंतरापर्यंत घासत गेली व यात आदित्य कणसे व दक्षू शर्मा हे दोघे जागीच मृत झाले. तर चेश्ता गंभीर जखमी झाली व कृष्णांश ही जखमी झाला. चेश्ता हिला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारादरम्यान दहा दिवसांनंतर मृत्यू झाला.











