महिला बचत गट व मायक्रो फायनान्स कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी महिलांचे इंदापूर तहसील कचेरीवर राज्यस्तरीय आंदोलन
बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने आंदोलन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोना महामारी ने कुटुंबाच्या गरजा भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे लॉक डाऊन मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिला बचत गट मायक्रो फायनान्स कंपनी नागरिकांना हप्ते भरण्यास तगादा लावत आहे. फायनान्सचे हप्ते कसे भरायचे असा यक्ष प्रश्न महिलांसमोर असल्याने अक्षय बहुजन मुक्ती पार्टी ने आंदोलनाचा पवित्रा घेतला. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने मोठ्या उद्योगपतींचे 68 हजार कोटींचे कर्ज माफ केले त्या पद्धतीने या सामान्य वर्गातील महिलांचे कर्ज माफ करावे आणि जोपर्यंत कर्ज माफ होत नाही तोपर्यंत फायनान्स कर्ज वसुली थांबवण्यात यावी अशी मागणी करत बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इंदापूरात आंदोलन केले.
बहुजन मुक्ती पार्टीच्या महिला आघाडी प्रमुख अॅड. सुजाता चौंदते यांच्या सूचनेनुसार इंदापूर शहरातील प्रशासकीय भवन समोर महिलांनी राज्यस्तरीय आंदोलन केले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड.राहुल मखरे म्हणाले, धनदांडग्यांचे हजारो कोटी रुपये सरकारने कर्ज माफ केले, मात्र रोजीरोटीसाठी धडपडणाऱ्या गोरगरीब जनतेची, महिलांची सरकारला काळजी नाही. गोर-गरीब जनतेने छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतले होते मात्र सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे रोजगार व्यवसाय अडचणीत आले आहेत, त्यामुळे कर्ज फेडणे अवघड झाले आहे. त्यामुळे महिला बचत गट व मायक्रो फायनान्सचे कर्ज सरकारने त्वरित माफ करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
राज्यात अनेक ठिकाणी फायनान्सचे हप्ते भरू न शकल्याने महिलांनी आपले जीवन संपवल्याने त्यांचा प्रपंच उघड्यावर पडला असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव यांनी सांगितले. यावेळी अनेक महिलांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या. या बाबतचे निवेदन नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांच्या कडे सुपूर्द केले.











