सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने अडचणीतील काॅंग्रेसला जबरदस्त झटका. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष !
डॉ. संदेश शहा, इंदापूर
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यप्रणालीस कंटाळून आपला सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवून दिल्याने आधीच अडचणीत आलेल्या काॅंग्रेसला जबरदस्त झटका बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपल्या कार्यकर्त्यांच्या हस्ते पाठवलेल्या राजीनामा पत्राने खळबळ उडाली आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले असता, धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला राजीनामा पाठवून देत आपल्या मनाची खदखद व्यक्त केली आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्या कार्य पध्दतीवर निशाणा साधला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना जिल्हाध्यक्ष म्हणून आपणास कोठेही विश्वासात घेतले गेले नाही, तसेच पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघामध्ये काँग्रेसचे सभासद नसलेले भगीरथ भालके यांनी काँगेस पक्षाकडे अधिकृत मागणी केली नसताना देखील त्यांना तिकीट देण्यात आले, मग हे तिकीट कोणाच्या सांगण्यावरुन देण्यात आले? असा सवाल मोहिते पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे राजीनामा पत्रातील मजकूराने स्पष्ट झाले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनाम्याने काॅंग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे. मोहिते पाटील यांच्या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील काॅंग्रेसचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनाम्याने सोलापूर काॅंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोलापूर काॅंग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. धवलसिंह मोहिते पाटील आपली पुढील राजकीय भूमिका काय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सर्व मागण्या रास्त असून पक्षाने धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांचा राजीनामा स्विकारु नये. काॅंग्रेसने मोहिते पाटील यांचा राजीनामा स्विकारल्यास सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आपल्या पदाचा राजीनामा देणार असून धवलसिंह मोहिते पाटील पुढील जो निर्णय घेतील, आम्ही त्यांच्या सोबत राहू असे काॅंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनामा पत्रावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कुठलीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या सूचक मौनामुळे या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र राज्यात आधीच गलित गात्र बनलेल्या काँग्रेस पक्षाला कार्यकर्ते सोडून जात असतील तर मोठा झटका बसू शकतो.











