मुंबई : महान्यूज लाईव्ह
महायुतीचे सरकार राज्यात येताच किरीट सोमय्या पुन्हा चर्चेत येऊ लागले आहेत. किरीट सोमय्या यांनी ज्यांचे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते सगळे आता महायुतीमध्ये आहेत. मग आता किरीट सोमय्या यांचं नेमकं काम काय उरलंय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो, परंतु तसे नाही. आता किरीट सोमय्यांनी मालेगाव येथील नामको बँकेचं आर्थिक गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढलं असून त्याला व्होट जिहादसाठी हे पैसे वापरल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. याप्रकरणी सोमय्या यांनी ईडी, सीबीआय आणि रिझर्व्ह बँकेमध्ये तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. त्यावरून ईडीने मुंबईसह अहमदाबाद मध्ये सात ठिकाणी छापे टाकून 13.50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
आता सोमय्या यांनी हे प्रकरण म्हणजे व्होट जिहाद घोटाळा असून तो एक हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे मत मांडले आहे. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणुकीत देखील या बँकेमार्फत व्होट जिहाद करण्यात आला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवारी आपण मालेगावला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे.











