बारामती : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील कोयता गॅंगचे अनुकरण ग्रामीण भागातही होऊ लागले असल्याची भीती आता निर्माण होऊ लागली आहे, कारण काल बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये एका युवकावर कोयता गॅंगने प्राणघातक हल्ला केला. यात एक तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. वडिलांबरोबर भांडण केल्याचा जुना राग मनात धरून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.
या हल्ल्यात माळेगाव येथील प्रकाश उर्फ पप्पू दिगंबर भापकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून या घटने प्रकरणी माळेगाव पोलिसांनी चेतन बाळू जाधव, मयूर रणजीत जाधव, विजय बाळासाहेब कुचेकर ( तिघेही रा.माळेगाव,ता.बारामती ) आणि दिनेश आडके ( रा.शिरवली, ता.बारामती ) या चार जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन जाधव याच्या वडीलाबरोबर काही दिवसांपूर्वी भापकर याचे भांडण झाले. यामध्ये भापकर याने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली याचा जुना राग मनात धरून चेतन जाधव याने इतर तिघांच्या मदतीने भापकर हा काम करत असलेल्या फायनान्सच्या कार्यालयात जाऊन तिथे त्याच्यावर हल्ला केला. भापकर याच्यावर कोयत्याने वार केले. दरम्यान आरडाओरडा ऐकून स्थानिक धावत आले, हे पाहून हे चौघेजण पळून गेले.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत चौघांना पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. त्यातील तिघांना फलटण नगरपालिकेच्या कचरा डेपोच्या हद्दीत पोलिसांनी पाठलाग करून पकडले. तर एकाला बारामती नगरपालिकेच्या हद्दीत ताब्यात घेतले.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगावचे सहायक निरीक्षक सचिन लोखंडे, फौजदार अमोल खटावकर, देविदास साळवे सहाय्यक फौजदार शरद तावरे, अमर थोरात, ज्ञानेश्वर सानप, नंदकुमार गव्हाणे, राहुल पांढरे विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, जालिंदर बंडगर, विकास राखुंडे, सागर कोळेकर, विक्रम मदने यांच्या पथकाने केली.











