ज्ञानेश्वर रायते, बारामती
काल बाजारात फक्त वीस रुपयांना किलो दरानं पेरू विकला जाताना पाहून काळजात धस्स झालं.. हा पेरू पिकवण्यासाठी तिथपर्यंत आणण्यासाठी त्या शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागले असतील हे फक्त शेती करणाराच जाणो.. गेल्या एका दशकात पेरूच्या नवीन जाती बाजारात आल्या; त्यांनी काही काळ बाजारपेठेवर अधिराज्य केले देखील; परंतु कधीकधी हा मंदीचा सामना एवढा करावा लागतो की, छातीचा कोट करून तयार केलेलं पीक जणू आयतं विक्रेत्यांच्या घशात घालायचं, त्यांनी मात्र मातीमोल खरेदी केलेल्या या फळांचं सोनं करायचं! हा लपंडाव गेले अनेक वर्ष सुरूच आहे!
ग्राहकांना अधिक दराने पेरू विकायचा; फक्त पेरूच नाही कोणतेही फळ झाले तरी शेतकऱ्याला मिळणाऱ्या त्याच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट ते तिप्पट उत्पन्न विक्रेत्यांना आणि मध्यस्थ असलेल्या दलालांना मिळते! यात कसलं आलय शेतकऱ्यांचे हित? शेतकऱ्यांची ही परवड थांबवणारी नवी व्यवस्था जन्माला कधी येणार आहे? सातत्याने शेतकरी म्हणतायेत की, आम्हाला सुविधा नको, पण शेतमालाला हमीभाव द्या आणि आमच्या सर्व सुविधा काढून घ्या. पण खाणाऱ्यांची तोंड अधिक आणि पिकवणाऱ्यांची तोंड कमी असलेल्या या नव्या बाजारभावाचे गणित लक्षात घेणारं कोणतंही सरकार सत्तेवर आलं तरी, शेतकऱ्यांच्या या आर्त हाकेला कोणीच प्रतिसाद देत नाही.
शेती आणि शेतकऱ्यांचे नातं म्हणजे केवळ काळ्या आईचं आणि लेकराचं नाही… तर स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या कष्टकऱ्याचं देखील आहे.. शेती अपेक्षेची आश्वासनांची आणि पेरलेल्या स्वप्नांची असते.. कधीकधी तिचं सोनं होतं तर बऱ्याचदा ती मातीमोल ठरते.. एखादं पीक एखाद्या काळात जोमदार उत्पन्न देतं ..तेच पीक दोन-तीन वर्षानंतर मंदीत देखील खेचतं.. कधी काही वर्षांपूर्वी अचानक व्ही एन आर, पिंक तैवान अशी पेरूची नवीन जमात शेतात आली आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं..
काल-परवापर्यंत रुबाबात विकला जाणारा हा पेरू अगदी काल वीस रुपये किलोवर आला; म्हणजे किरकोळ विक्रीवर! म्हणजेच शेतकऱ्याला कितीला पडला असेल तुम्हीच विचार करा! फळबागा झाल्याच तर सोन्याच्या.. नाहीतर पितळेच्या असाच काहीसा अनुभव अलीकडल्या काळात येतो. फळबागांमध्ये पैसाही आहे परंतु तेवढीच रिस्क देखील आहे.. जो शेतकरी हा रिस्क उचलतो तो प्रत्यक्ष शेतकरी बाजीगर ठरतो; म्हणजेच हरला तरीही आणि जिंकला तरीही!
द्राक्ष, केळी, डाळिंब, पेरू ही पिके तशी भरपूर उत्पन्न देणारी, परंतु अधूनमधून त्याला मंदीचा सामना करावा लागतो. आपल्या बागेत उभारलेले हिरवे पीक हेच शेतकऱ्यांसाठी त्याच्या जगण्याचे टॉनिक असते. म्हणूनच एखाद्या वर्षी पिकाने दगा दिला म्हणून शेतकरी हरत नाही, पण याचा अर्थ असा नाही की, त्याच्या डोळ्यात आसवं नाहीत.
दुर्दैव या गोष्टीचं आहे की, प्रचंड मेहनत करून, प्रतिकूल हवामानाशी झगडत, रक्ताचे पाणी करून तो जे फळाचे उत्पादन घेतो, त्याची मातीमोल किंमत बाजार समितीमध्ये होते आणि तेच मातीमोल दराचे फळ विक्रेता मात्र चढ्या भावाने बाजारपेठेत विकतो. एक कळत नाही, दहा रुपये किलोने त्याचा घेतलेला पेरू 20 ते 30 रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जातो, म्हणजेच ग्राहकाला तो खरेदीला परवडत असेल, तर शेतकऱ्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला का मिळत नाही?
ज्या विक्रेत्याची एक गुंठाही जमीन नाही, ते रात्रीच्या वेळी बागांना पाणी दिलेले नाही, पावसा पाण्याच्या काळात बागेत थांबण्याचं कष्ट त्याला अनुभवायला मिळाले नाही, तो विक्रेता मात्र आरामात शेतकऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो! हे उलट गणित कधी पर्यंत चालणार आहे? बाजारातल्या या उलट्या पट्टीवर का आजपर्यंत आंदोलने होत नाहीत? ज्या बाजार समित्या शेतकऱ्यांच्या जीवावर तयार करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आल्या त्याच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यावरच अन्यायाचा आसूड का उगवला जातोय? हे चित्र बदलणार कधी? शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी सर्व सुविधा घेऊन जे आडते त्यांचे गाळे उभारतात व शेतकऱ्यांच्या जीवावर संपत्ती कमवतात त्यांनाही कधी शेतकऱ्यांचा आक्रोश का दिसत नाही?
दहा रुपयांना एक..वीस ला किलो..!! आज गुरुवार असल्याने दारातच बाजार भरलेला होता…बाजारात मोठ्या प्रमाणावर पेरूची आवक झाली होती..!! स्वतः शेतकरी देखील ओरडून ओरडून दहा ला एक वीस ला किलो म्हणून पेरू विक्री करत होते..!! काल टोळनाक्यावर दहा बाराजण गाड्यांच्या पाठीमागे पळू पळू पेरू विकताना पहिले होते..!! एकंदरीत गेल्या वर्षी ज्या पिकानं शेतकऱ्यांची कॉलर टाईट केली होती तेच पीक आज शेतकऱ्यांना रस्त्यावर घेऊन आलंय असं वाटायला लागलंय..!! शेती म्हणजे स्वप्नांचा पाठलाग ठरत असतो शेतकऱ्यांसाठी..!! ज्या पिकाचे पैसे होत आहेत तिथं एकदोन वर्षांत फार मोठी मंदी पहायला मिळते..!! द्राक्ष शेतीसुद्धा गेल्या काही दिवसांत आशाच पद्धतीने अडचणीत आल्याचं आपण पाहिलंय..!! फळबागा जेवढ्या चांगल्या तेवढीच त्यात रिस्क असते..कारण वाढलेलं क्षेत्र लवकर कमी होत नाही..!! ज्या पेरूची चव अप्रतिम आहे म्हणून त्याला सगळीकडेच तुफान मागणी होती त्याच पेरूला हे दिवस इतक्या लवकर येतील असं वाटलं नव्हतं..!! तरीही पेरू उत्पादक शेतकऱ्यांबद्दल नक्कीच सहानुभूती वाटते…!! हे ही दिवस जातील आणि लवकरच पेरूचे दर वाढतील याच अपेक्षा..!! धन्यवाद 👏👏











