राज्यामध्ये संध्याकाळी पाच नंतर रात्री आठ पर्यंत 76 लाख मतदार कुठून आले असा सवाल वेगवेगळे राजकीय नेते करत असतानाच आता माळशिरस तालुक्यातल्या मार्केट वाडीत वेगळाच अंक गाजतोय. एकीकडे पोलिसांनी मतदान घेण्यास विरोध केला आहे आणि दुसरीकडे गावातील नागरिकांचा संशय मात्र कायम आहे.
वीस तारखेला मतदान झाले, परंतु आमच्या मनासारखे झाले नाही. म्हणून आम्ही इथे बसलो आहोत असे सांगत इथल्या नागरिकांनी आणि उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेत असल्याचे निक्षून सांगितले, पण पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला होता. अशा वेळी नागरिकांनी पोलिसांच्या बापाचं भ्या नाय. आमचं मतदान हाय. आम्हाला मतदान करायचंय. आम्ही काय पोलिसाला भीतू काय तवा? आम्हाला अडावलं, मारलं तरीबी आम्ही मतदान करणार. असे सांगत ठाम निर्धार व्यक्त केला होता.
दरम्यान आज पत्रकारांशी बोलताना गावातील नागरिकांनी, आमची चीड का म्हणून? तर आजवर आमचं गाव लीडवर असायचं. ते आमचं मतदान कुठे गेलं; ते आम्ही हुडाकतोय असं सांगत गावकऱ्यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली आहे. काहीही झालं तरी मतदान करणारच असं गावकऱ्यांनी सांगितलं.











