पुणे : महान्यूज लाईव्ह
ट्रॅक्टरवर काम करताना अनेकांना आपल्या लहान मुलांना ट्रॅक्टरवर बसवण्याची सवय आहे, परंतु हा लाड जीवावर बेतू शकतो. पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील शिंदवणे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत हकनाक पाच वर्षाच्या मुलीला जीव गमवावा लागला, तर सात वर्षाचा मुलगा जखमी झाला.
हवेली तालुक्यातील शिंदवणे गावच्या हद्दीत वरचा मळा परिसरात मुक्ता फार्म हाऊस येथे शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी ही घटना घडली. शेतात नांगरणी सुरू होती. नांगरणी झाल्यानंतर ट्रॅक्टर विहिरीजवळ थांबवला होता. यावेळी ट्रॅक्टरवर शेत कामगारांची दोन लहान मुले बसवली होती. दरम्यान विहिरीत असलेल्या एका मोटरची वायर काढली होती, ती जोडण्यासाठी ट्रॅक्टर चालक विहिरीत उतरले. त्याचवेळी असताना हा प्रकार घडला.
ट्रॅक्टर वर बसलेल्या दोन लहान मुलांनी अचानक ट्रॅक्टर चालक ज्याप्रमाणे ट्रॅक्टर चालू करतात ते पाहिले होते. त्यानुसार मुलांनी ट्रॅक्टर सुरू केला आणि ट्रॅक्टर सरळ विहिरीत कोसळला. दरम्यान मुलाने ट्रॅक्टर चालू केल्याची दिसताच ट्रॅक्टरचालकाने प्रसंगावधान राखत पळत जाऊन एका मुलाला खाली ओढले, दुसऱ्या मुलीला काढण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत ट्रॅक्टर कोसळला. ट्रॅक्टरचालकाने मुलीला देखील लगेचच बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कारण उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.











