घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमाराची. लग्नाहून परतणाऱ्या पाच डॉक्टरांची स्कॉर्पिओ जीप प्रचंड वेगाने डिव्हायडर वर आदळली आणि डिव्हायडर तोडून ती पलटी झाल्यानंतर पाच डॉक्टरांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.
ही घटना उत्तर प्रदेश मधील कन्नौज जिल्ह्यातील आग्रा लखनऊ द्रुतगती महामार्गावर घडली. यातील पाचही डॉक्टर सैफई मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या या डॉक्टरांनी लखनऊ येथे लग्नाला जाण्यासाठी स्कॉर्पिओ जीप घेतली होती. लग्न उरकून परत येत असताना रस्त्याच्या पलीकडे डिव्हायडर तोडून एका ट्रकला जोरदार धडक दिली.
या घटनेत डॉक्टर अनिरुद्ध वर्मा, संतोष कुमार मौर्य, जयवीर सिंह, अरुण कुमार आणि डॉक्टर नरदेव या पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घेतली. ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोपेची धुंदी असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.











