धाराशिव : महान्यूज लाईव्ह
घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी गावची. एका 25 वर्षीय विवाहित महिलेने घरात गळफास घेतला तत्पूर्वीच तिच्या घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये दोन बाळांची मृतदेह तरंगताना आढळून आले.
घट्टेवाडी गावातील राधिका घट्टे या महिलेने ही गळफास घेऊन आत्महत्या केली असून, तिच्याच घरात श्रेया घट्टे व श्रेयस घट्टे ही दोन लहान मुले घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये मृतावस्थेत आढळून आली. या घटनेने संपूर्ण तुळजापूर तालुका हादरला असून मृत्यूचे कारण पोलीस तपासत आहेत.
घरातील पत्र्याच्या अँगल ला दोरीने गळफास घेऊन या महिलेने आत्महत्या केली. मात्र तत्पूर्वीच या दोन बाळांचाही दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. कारण ही दोन्ही लहान मुले पाण्याच्या बॅरलमध्ये तरंगताना आढळून आली. एकाच घरातील तिघा जणांच्या या विचित्र मृत्यूने पोलीस देखील चक्रावून गेले असून, या मृत महिलेच्या दिराने नळदुर्ग पोलिसांकडे आत्महत्या केल्याची फिर्यादी दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.











