पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी होणार असून या मतमोजणीच्या 465 फेऱ्या होणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएम मतमोजणीच्या एका फेरीसाठी साधारणपणे 20 मिनिटे एवढ्या कालावधी अपेक्षित असून 2023 कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यात या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या 553 असून, मतमोजणी सहाय्यक 577 आहेत, तर सूक्ष्म निरीक्षकांची संख्या 528 असणार आहे.
एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 24 टेबल मांडले जाणार असून ईव्हीएम मतमोजणीसाठी 391 टेबल मांडण्यात येणार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार सर्वाधिक 30 फेऱ्या पुरंदर तालुका मतदार संघासाठी असणार असून, सर्वात कमी 19 फेऱ्या आंबेगाव मतदार संघासाठी राहतील. दरम्यान सुरुवातीला पोस्टल आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट या मतपत्रिकांची मोजणी होणार असून, त्यानंतर ईव्हीएम यंत्राची मतदानाची मोजणी होणार आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जुन्नरमध्ये 20 फेऱ्या होणार असून, खेड, आळंदी, शिरूर, बारामती, पिंपरी, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ या मतदारसंघात प्रत्येकी 20 फेऱ्या होणार आहेत. तर दौंड तालुक्यात 23 फेऱ्या होणार असून, इंदापूर व खडकवासला तालुक्यात 25 फेऱ्या होणार आहेत. पुरंदर तालुक्यात 30 फेऱ्या होणार असून, भोर तालुक्यात 24 फेऱ्या होणार आहेत. मावळमध्ये 29 फेऱ्यांमध्ये, चिंचवड मध्ये 24 फेऱ्यांमध्ये, भोसरी व वडगाव शेरी मध्ये प्रत्येकी 22 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. हडपसर मतदार संघात 22 फेऱ्या होणार आहेत











