राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह
दौंड. : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता दौंड तालुक्यातही बिबट्याने पहिला बळी घेतला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव – बोरीपार्धी हद्दीत अडीच महिन्याच्या बाळावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या बाळाला केडगाव परिसरातील खाजगी रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दौंड वन विभागाच्या हलगर्जीपणा आणि नाकर्तेपणामुळे दौंड तालुक्यात बिबट्याने हा पहिला बळी घेतला आहे. वन विभागाच्या या कारभारावर दौंड तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ऊसतोड मजूर असलेल्या करण दिलीप गायकवाड (मुळगाव शिदवाडी ता. चाळीसगाव जि. जळगाव, सध्या रा. केडगाव टोल नाका ता. दौंड जि. पुणे) यांच्या अडीच महिन्याच्या बाळावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि १७ ) दुपारी ४ वाजण्याच्या आसपास बोरीपार्धी हद्दीत घडली.
उसाच्या शेतात आईने झोळीमध्ये या बाळाला झोपवले होते. दुसरी एक चिमुकली शेजारीच खेळत होती. आई-वडील समोरील शेतात ऊसतोड करत होते. हा परिसरात ऊस शेती असल्यामुळे उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने खेळत असलेल्या चिमुकल्या दिशेने धावून आला मात्र या चिमुकलीने मोठ्याने आरडाओरडा केल्याने झोळीत झोपलेल्या अडीच महिन्याच्या बाळावर बिबट्याने हल्ला केला.
बाळाच्या मानेवर चावा घेतला. या हल्ल्यात बाळ जखमी झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने आई-वडिलांनी हंबरडा फोडला. हे दृश्य पाहणाऱ्यांचेही डोळे ओलावले होते. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल वाय. के. वीर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, मागील दोनच दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील मांडवगण येथे एका चिमुकल्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पाटस आणि कानगाव येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी दौंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी धारेवर धरले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यानी नेहमी प्रमाणे टाळाटाळ करत सुईनुसार उत्तरे दिली. मागील अनेक वर्षापासून दौंड च्या नदीपट्ट्यातील गावे तसेच पुन्हा सोलापूर महामार्गाच्या गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दौंडचा वन विभाग मात्र हातावर हात देऊन बसला आहे. बोरीपार्धी येथील या घटनेनंतर आता तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.











