विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. बारामती विधानसभा निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संपूर्ण पवार कुटुंब प्रचारामध्ये उतरले आहे. अजित पवार यांनी आज सकाळीं बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा गावभेट दौरा केला.
यावेळी गावभेट दौऱ्यादरम्यान अजित पवार बोलताना म्हणाले, लोकसभेला माझी गंमत केली. ठिक आहे, तो तुमचा अधिकार होता. मात्र आता विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमत होईल. मी खोटं नाही सांगत. तुमच्या लक्षात येत नाही की, काही लोकांनी भावनिक करायचा प्रयत्न केला, तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल.
परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलंय, दीड वर्षांनी मी उभा राहणार नाही. निवडणूक लढवणार नाही आणि खासदारही होणार नाही. मग त्याच्यानंतर कोण बघणार आहे? याचा विचार करा. इतर कोणाच्या ती धमक नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले, मला तुम्ही १९९१ पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाकाकी कधी बाहेर आल्या आहेत का? नाही ना? मग आत्ताच का? याच नातवाचा का एवढा पुळका आलाय काय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो, तर गोष्ट वेगळी होती. की बाबा त्यानं वाटोळं केलं बारामतीचं, फार बाद झाला, याच्या हातात बारामती दिली, तर वाट लावेल असं काही असतं, तर गोष्ट वेगळी असती. आता मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की, काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला? आत्ता विचारण्याची वेळ नाही असंही अजित पवार म्हणाले.











