शिरूर : महान्यूज लाईव्ह
मांडवगण फराटा (ता.शिरूर, जि.पूणे) येथील टेंभेकर वस्ती येथे घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्याला बिबट्याने अचानक हल्ला करत उचलून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक महिन्यापूर्वी याच भागात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता. ही दुसरी घटना घडली असल्याने परिसरात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
शिवतेज समाधान टेंभेकर (वय.४वर्षे, रा. फराटेवाडी, मांडवगण फराटा) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवार दि.१५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शिवतेज हा अंगणात खेळत होता.
सायंकाळच्या सुमारास सदर वस्तीवर लाईट नव्हती.यावेळी अचानक बिबट्याने अंगणात येत चिमुकल्यावर हल्ला करत उचलून नेले.ही घटना घडल्यानंतर कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरड केली. यानंतर स्थानिकांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर मुलाला शोधण्यात यश आले. पण मुलावर गंभीर हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला होता.
त्यानंतर घटना घडल्यानंतर सुमारे एक तासाने वनविभाग जागे झाला. वनविभागाचे अधिकारी दाखल होताच स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर लाईट नव्हती. ज्या ठिकाणी घटना घडली होती.तेथे विजेचा सतत लपंडाव सुरू असतो. शुक्रवारी दिवसभर येथे लाईट नव्हती. अंगणात खेळत असताना कुटुंबियांच्या समोर ही घटना घडल्याने मुलीच्या आईचा,आजीचा मोठा टाहो घटनास्थळी होता.
घटनेची माहिती कळताच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते दाखल झाले होते. तर मुलाला शोधण्यासाठी शेकडो युवक घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान दि .१९ ऑक्टोबर रोजी गोकुळनगर परिसरात वंश शिंग या मुलावर देखील बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेला एक महिना होत नाही, तोच ही दुसरी घटना घडली आहे. वन विभागाला एक महिन्यात १४ पिंजऱ्यात एक बिबट्या देखील सापडला नाही, त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.
एक महिन्यात या परिसरात अनेकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते.मात्र वनविभाग या कडे गांभीर्याने लक्ष देत नव्हता. अखेर पुन्हा या भागात ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाला खडे बोल सुनावले. महावितरणने पूर्व भागात दिवसा लाईट पुरवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











