महान्यूज : आजची गझल
दैन्य दारा पुढे वाजवी चौघडे
जाळतो जीव अन् पेटती आतडे
बाळसेदार पाहून घ्या ही पिढी
सापळ्यावर जसे झाकले कातडे
हालती फासळ्या श्वास आहे सुरु
सांग तगतील कुठवर असे पोपडे
काय शिकतील सांगा मुले आमची
ना फळा ना खडू मोडकी बाकडे
का दिसेना तुला या जिवांची दशा
काय डोळ्यास तू लावली झापडे
रोज गजरात करतो तुझ्या आरत्या
अन् प्रसादात माझ्याच येती खडे
प्रश्न आहे तसा ठेवला मी पुढे
यात काही कुठे बोललो वाकडे
गझलकार – – शिव डोईजोडे, उदगीर
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











