राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस आणि कानगाव हद्दीतील श्री सिमेंट कंपनीचा महाराष्ट्र सिमेंट प्रकल्पाने मोठया प्रमाणात वायू प्रदूषण केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवार (दि.३०) पुन्हा एकदा नोटीस काढून वायू प्रदूषणाचा ठपका ठेवत कारवाईचा इशारा दिला आहे.
कानगाव आणि पाटस परिसरातील शेतकरी आणि नागरीकांच्या विरोध असतानाही तालुक्यातील बड्या नेत्यांच्या आशिर्वादाने आणि स्थानिक गाव पुढाऱ्यांच्या पाठबळामुळे काही वर्षांपूर्वी सुरू झालेली महाराष्ट्र सिमेंट प्रकल्प अंतर्गत असलेल्या श्री सिमेंट कंपनी सातत्याने वादग्रस्त ठरली आहे. परिसरातील शेतकरी आणि कंपनीचे अधिकारी यांच्यात सातत्याने वाद होत आहेत.
पोलीस चौकीत स्थानिक पुढाऱ्यांनी हे मिटवल्याच्या घटना घडल्या आहेत. कारण ही श्री सिमेंट कंपनी वाहतूक मार्गावर व परिसरात मोठया प्रमाणात प्रदूषण करत आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. कानगाव मार्गावर कच्च्या मालाची गळती होत असल्याने वाहन चालकांना व स्थानिक ग्रामस्थांना वायू प्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात २५ ऑक्टोबर रोजी श्री सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाबाबत वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली होती. या अनुषंगाने पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्री सिमेंट कंपनीला अंतिम नोटीस बजावली. या नोटीसमध्ये कंपनीने राखेची साठवणूक करण्यासाठी एक महिन्यामध्ये साठवणुकीची सोय करावी. कंपनीने क्लिंकर, राख आणि स्लॅग या कच्च्या मालाची वाहतूक फक्त रेल्वे मार्गाने करावी.
श्री सिमेंट कंपनीने सोलापूर येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमधून राख खरेदी केली पाहिजे. एका महिन्याच्या कालावधीत कंपनीच्या सर्व प्रवेश आणि अस्तित्वात असलेल्या ठिकाणी वाहनांचे टायर धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कंपनीने प्रदूषण टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला आणि आतमध्ये कायमस्वरूपी पाणी शिंपडण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी.
कंपनी परिसरापासून गावाच्या रस्त्यापर्यंत म्हणजेच सिमेंट प्रकल्पापासून पाटस स्टेशन रस्त्याची साफसफाई करण्याची व्यवस्था करावी. राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाद्वारे पर्यावरणीय मंजुरीच्या अटींचे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संचालनासाठी दिलेल्या संमतीचे श्री सिमेंट कंपनीने काटेकोरपणे पालन करावे. तसेच कंपनीची पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त केली जात असून कंपनीने नव्याने पाच लाख रुपयांची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात सादर करावी असे निर्देश प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तसेच कंपनीचे वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात टाळाटाळ केली, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद या कंपनीला यावेळी देण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीस बाबत माहिती नसल्याचे श्री सिमेंट कंपनीचे अधिकारी रवी पांडे यांनी सांगितले.
श्री सिमेंट कंपनीला एकूण चार नोटीसा प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केल्या आहेत. श्री सिमेंट कंपनीला फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीसा बजावण्यात आली होती. या नोटिसांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत विविध निर्देश देण्यात आले होते. पण सिमेंट कंपनीच्या प्रशासनाकडून या नोटीसांला कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून प्रदूषणाचे नियम जाणीवपूर्वक धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण सुरू आहे. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत.











