विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
शरद पवार सध्या कमी बोलतात. जे बोलतात ते तोलून मापून बोलतात. साधारणपणे त्यांची भाषणे आठ ते दहा मिनिटांची कधीकधीच पंधरा मिनिटांची असतात. बारामतीत मात्र त्यांनी आज तब्बल 52 मिनिटे भाषण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलेल्या प्रचाराच्या शुभारंभाच्या भाषणातील प्रत्येक शब्द न शब्दाचा समाचार देखील घेतला. आज पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भाषणात संयमी शब्द, पण प्रचंड कठोरता आणि तीव्रता होती.
शरद पवार म्हणाले, सुप्रियाची निवडणूक होती, सुनेत्रा उभी होती. त्यावेळी साहेब येतील, डोळ्यात पाणी आणतील. लोकांना भावनिक करतील. भावनिक होऊ नका असे आवाहन करण्यात आले होते. बरोबर ना? पण कालचे भाषण ऐकले का? असे म्हणत शरद पवारांनी चष्मा काढला आणि डोळ्यावरून रुमाल फिरवला त्यांच्या या कृतीने सगळीकडे हशा पिकला. मग काही काळ फक्त घोषणा सुरू झाल्या.
दरम्यान शरद पवारांनी अजित पवार यांनी काल केलेल्या वक्तव्याचा देखील मोठा समाचार घेतला. कालच्या सभेत अजित पवार म्हणाले होते की, आमचे तात्यासाहेबांचे घर मग साहेबांनी फोडले असे म्हणायचं का? हे वक्तव्य शरद पवारांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले. शरद पवार तब्बल पाच मिनिटे या विषयावर बोलत होते.
ते म्हणाले, चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळाले होते. चार महिन्यांनी पद मिळाले असते.. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का? घर मोडणे माझा स्वभाव नाही.. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे. घर फोडण्याचं पाप मला कोणी शिकवलं नाही. माझ्या आई-वडिलांनी माझ्या भावांनी मला शिकवलं नाही. माझे भाऊ माझ्या पाठीशी होते. म्हणून मी समाजकारणात आलो. आजही मी घरात वडीलधारा आहे. त्यामुळे सगळ्यांचे हित मी पाहतो. आणि यापुढेही पाहत राहणार.
चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळाले. पाचव्या वेळी भाजपची मदत त्यांनी घेतली. इथल्या सगळ्यांना माहित आहे की, मी कधीच कोणत्या संस्थेत ढवळाढवळ केली नाही. लक्ष घातले नाही. इथले सगळे अधिकार त्यांना दिले. मी फक्त शेती आणि शिक्षणात लक्ष दिले. अनेक पद्धतीने अनेकांना मंत्री केले. पण खरं सांगा, सुप्रियाला कधी एक तरी पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. खरंतर तिने घर एक ठेवण्याचे काम केले.
आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गॅंग शब्द आहे. आम्ही ही गॅंग कधी वाढू दिली नाही. बारामतीचा चार वेळा उपमुख्यमंत्री झाला, पाचव्यांदा मात्र भाजपची मदत घेतली. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून दिले. भाजपने मत नव्हतं दिले, तरी मग मदत का घेतली? आज सांगितले जात बारामतीचा विकास मी केला. बारामतीच्या विकासात माझा, अजित दादांचा हात असेल.. ज्यांचा चांगले आहे ते चांगले म्हणणं हा माझा स्वभाव आहे.
1972 मध्ये विद्या प्रतिष्ठान स्थापन केली. कृषी विकास प्रतिष्ठान उभारले कृषी विकास प्रतिष्ठान मध्ये तर पुढील वर्षी सरासरी 36 काढण्याचा ऊस आम्ही दाखवत आहोत. त्याचे जे संशोधन बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. खरे तर आम्ही येथील लोकांना जे पाहिजे ते दिले. आम्ही दुधावरचे धंदे काढले, वाईनचा कारखाना येथे काढला, मात्र त्याची वाईन पूर्णपणे निर्यात होते. पण आम्ही दारूचे कारखाने काढले नाहीत, बर का! असं म्हणत त्यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
महाराष्ट्र उद्योगधंद्याच्य बाबतीत एक नंबरचे राज्य होते. रतन टाटा नागपूरला कारखाना काढणार होते, पण आमचं सरकार बदलले आणि मोदींनी त्यांना बोलवलं आणि सांगितले की, कारखाना गुजरातला काढायचा.. महाराष्ट्र चा कारखाना गुजरातला हलवला.वेदांता फॉक्सकॉन गुजरातला नेला. प्रधानमंत्री देशाचा असतो एका राज्याचा नसतो. अनेक कारखाने गुजरातला नेले. त्यामुळे महाराष्ट्राचा नंबर 5 वर गेला. म्हणून बेरोजगारी वाढली. हे सरकार शेतकरी हिताचे काम करीत नाही. आज देशात शेतकऱ्यांची थकबाकीदारी वाढते आहे मात्र सरकारचे काहीच लक्ष नाही पिकवणारे टिकणार नाहीत मग खाणारे काय खाणार? शेतकऱ्यांना मूलभूत किंमत पाहिजे. पण हे सरकार देत नाही.आज थकबाकीदारांची संख्या वाढते आहे, याचा अर्थ शेतकरी अडचणीत आहे
त्यामुळे जो शेतकरी अडचणीत आणतो, त्याला आपण दारात उभे करणार नाही असा निकाल घ्यावा लागेल. सोयाबीन आपण निर्यात करायचो, सरकारने त्यावर कर बसवला. त्यामुळे दर खाली आहे. शेतकरी अडचणीत आला. साखरेवर कर लावला. पंतप्रधान मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. ते बारामतीत आले. माझे कौतुक केले. पण जर लोकांचे नुकसान होत असेल तर ते आपले जोडीदार असू शकत नाही.
राष्ट्रवादीच्या खटल्या संदर्भातही शरद पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, बारामतीकरांनी अनेक वर्ष मला साथ दिली. अजितला दिली. सुप्रियाला दिली. आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या. लोकांनी ही साथ कायम ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. तुम्ही साथ दिली. अनेक जण निवडून दिल. राज्य ताब्यात आले. पण खरं सांगा, राष्ट्रवादी पक्ष कुणी काढला? पक्ष मी काढला.. पण काही लोकांनी आमच्यावरच खटला केला. कधी मी कोर्टात उभे राहिलो नव्हतो, पण काहींनी दावा केला की, हा पक्ष त्यांचा नाही आमचा आहे. समन्स काढलं. कोर्टात माझ्या नावाने समन्स काढले. समन्स कधी पाहिल नव्हतं. तक्रार माझ्या नावाने, कुणाची तक्रार तर दोन्ही पवार! कोर्टात निकाल दिला. पक्ष चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही. पक्ष चिन्ह गेलं. नवीन चिन्ह दिल. लोकांना विनंती केली, आमचे उमेदवार निवडून द्या. लोकांनी निवडून दिले.
युगेंद्र पवारांचे कौतुक केले..
शरद पवार यांनी युगेंद्र पवारांचे कौतुक केले. म्हणाले, मी चार महिन्यात अनेक तालुके उलटे पालटे केले. कारण मला सत्ता बदलायची आहे
जनाई शिरसाई योजना कुणी आणली? सर्वांना माहीत आहेच. पण गेली अनेक वर्षे पाटबंधारे खाते कुणाकडे होते? मग एवढ्या कालावधीत का झालं नाही?
आता या निवडणुकीत नव्या पिढीला निवडून द्या. नेहमी नवीन नेतृत्व तयार करायचे असते. उद्याचा विचार करून म्हणून आम्ही युगेंद्रचा निर्णय आम्ही घेतला आहे. युगेंद्र पवारांची निशाणी तुम्हाला माहित आहे.. तुतारी वाजवणारा माणूस आहे. नुसती तुतारी नको. निवडणूकीमध्ये कुणी काही बोललं, तरी डोकं शांत ठेवा. कुणीही काही केलं तरी मान खाली घालून जा. संयम ठेवा. संयमाने निवडणूक बघायची असेल, तर बारामती बघायला जा असे उदाहरण दाखवून द्या.











