पुणे : महान्यूज लाईव्ह
निवडणुकीच्या तोंडावर पैशापाण्याच्या अनेक गोष्टी घडू लागल्या आहेत. पुण्यामध्ये खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वीच पाच कोटी रुपये सापडल्याची चर्चा अजूनही विरत नाही, तोच पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 138 कोटींचे सोने पोलिसांनी पकडले आहे.
सातारा रस्त्यावर सकाळच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये हे कोट्यावधींचे सोने जप्त करण्यात आले आहे. एक संशयित वाहन या रस्त्याने येणार होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हा ट्रक अडवला. यामध्ये तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने सापडले. यामध्ये सोन्याचे दागिने होते.
अर्थात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही सोन्याची डिलिव्हरी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. काही दिवसांपूर्वीच खेड शिवापुर टोल नाक्यावर पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर ही रोकड एका आमदाराशी संबंधित असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण थंड पडले. तेवढ्यात जामनेर तालुक्यातही दीड कोटी रुपये पोलिसांना एका गाडीत आढळून आले होते.
सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात नाकाबंदी केली जात आहे. यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रकमा सापडत आहेत. नोटाबंदीनंतर दोन लाखापेक्षा अधिक रक्कम हाताळता येत नसल्याचे शासनाचे नियम असूनही आचारसंहितेच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी असण्याची शक्यता असतानाही रोकड अथवा सोने फिरत असल्याने नागरिकांच्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.











