दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसरुंगाचा स्फोट होऊन चार जवान जखमी झाले होते. त्यामध्ये खंडाळा तालुक्यातील बावडा येथील सुपुत्र अमर पवार हे शहीद झाले. सोमवारी शहिद जवान अमर पवार यांना साश्रूपूर्ण नयनांनी अंतिम निरोप देण्यात आला.
शेतकरी कुटूंबात जन्मलेले अमर पवार यांचे प्राथमिक शिक्षण बावडा येथे, तर पुढील शिक्षण खंडाळा येथे झाले असून सन 2010 मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. एक तपापेक्षा अधिक काळ सैन्यात सेवा बजावणारे जवान अमर पवार छतीसगडमध्ये कार्यरत होते.
छत्तीसगडमधील नारायणपूर कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसरुंगाचा स्फोट होऊन चार जवान जखमी झाले. त्यामध्ये अमर पवार यांचा समावेश होता. जखमी जवानांना सैन्य दलाने कस्तुरमेटा कॅम्पमधून हेलिकॉप्टरच्या साह्याने उपचारासाठी रायपूरला दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान अमर पवार शहीद झाल्याचे वृत्त बावडा गावात धडकताच खंडाळा तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई वडिल, भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
जवान अमर पवार शहीद झाल्याची माहीती मिळताच कुटुंबीय, मित्र परिवार गहीवरून गेला. पार्थिव केव्हा येईल या बाबत प्रतिक्षा लागून राहिली होती.यावेळी पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना चौकात, पारावरील उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. दरम्यान, जवान अमर पवार यांच्यावर सकाळी पारगाव, खंडाळ्यात पुष्पवृष्टी करित आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.
त्यानंतर जवान अमर पवार यांचे पार्थिव मूळगावी बावडा येथे आणण्यात आले. याप्रसंगी कुटूंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. निवासस्थानाजवळ शहीद जवान पवार यांचे उपस्थितांनी दर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून रामनगरमधून सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा सुरू झाली. गावातील चावडी चौकातून पुढे रस्त्याने मिटकॉनच्या मैदानात आल्यानंतर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
सैन्य दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर भडाग्नी देण्यात आला. याप्रसंगी आ.मकरंद पाटील, जेष्ठ नेते बकाजीराव पाटील, शंकरराव गाढवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे- पाटील, पुरुषोत्तम जाधव, प्रदिप माने, विराज शिंदे, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक तसेच 53 बटालियनचे पथक, पोलीस अधिकारी उपस्थित होते.











