राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पट्ट्या लागत असलेल्या कानगाव, गार, हातवळण या भागात बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात बिबट्यांच्या कुटुंबांनी ठाण मांडले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर, महिला शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. तर दुसरीकडे वन विभागाकडून मात्र हालचाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
बिबट्यांसाठी पिंजरा लावण्याबाबत वनविभागाची उदासीनता आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण परिसरात दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करून त्याचा बळी घेतला. ही घटना ताजी असतानाही वन विभाग मात्र अद्याप जागा झाला नाही. दौंड तालुक्यातील बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गालगतच्या मध्यभागी असलेल्या पाटस आणि वरवंड या गावांमध्ये बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे.
शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करण्याच्या प्रकारात अलीकडे मोठी वाढ होत आहे. भीमा नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये तर शेतकऱ्यांना शेतात दिवसा काम करण्यासही भीती वाटू लागली आहे. दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी ओंकार फडके यांच्या उसाच्या शेतात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. या ठिकाणी बिबट्या खुलेआम फिरताना शेतकऱ्यांना दिसून आला आहे.
याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले. मात्र त्यांच्याकडून फक्त पंचनामा करणे, पाहणी करणे एवढेच काम केले जाते. तालुक्यातील बहुतांश गावांनी पिंजरा लावण्यासंदर्भात दौड वन भागाकडे पत्रव्यवहार केला आहे. याबाबत दौंडचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही पिंजरा लावण्याबाबत वन विभागाचे अधिकारी नागपूरच्या वन विभागाच्या आदेशानुसार पिंजरा लावला जातो, ते आमच्या हातात नाही. असे सांगून मोकळे होतात.
अर्थात प्रत्यक्षात मात्र स्थानिक वन अधिकारी आणि कर्मचारी कोणताही प्रयत्न करत नाही. असा आरोप आता शेतकरी करू लागले आहेत. दौंडचा वन विभाग माणसावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेण्याची वाट बघत आहेत का ?असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.











