सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील ही घटना. पैसे काय झाडाला लागतात का? असा प्रश्न अनेकदा तुम्हाला वाडवडिलांनी विचारला असेल, अर्थात पैसे झाडाला लागत नाहीत, पण ओढ्याला नक्कीच लागतात, हे मात्र याची देहा याची डोळा या भागातील नागरिकांनी पाहिले. आटपाडी गावात शनिवारचा आठवडे बाजार असतो. या दिवशी गावातल्या अंबाबाईच्या ओढ्याला पूर आला आणि पुरात पाचशेच्या नोटा वाहायला लागल्या.
शनिवारच्या या घटनेची सध्या सांगलीसह इतरही भागात चर्चा सुरू आहे. आटपाडी गावातील अंबाबाईच्या ओढ्यामागे पाण्यात नोटा वाहून आल्याची माहिती लोकांना अचानक कळली आणि बाजारासाठी आलेल्या लोकांना ओढ्यातून पाचशेच्या नोटा वाहत असल्याचे दिसून आले. अनेकांनी आपल्या हातातील कामे सोडून या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यामध्ये धाव घेतली. अनेक लोक ओढ्याच्या कडेला थांबून ओढ्यात उतरले.
ओढ्यात अचानक कसं काय नोटा आल्या? असा प्रश्न अनेकांना पडला, कारण या ओढ्याच्या कडेलाच बाजार भरतो. त्यामुळे आठवडे बाजारासाठी आलेले लोक सगळे ओढ्यात दिसत होते. ही घटना पोलिसांना कळेपर्यंत जवळपास दोन ते अडीच लाखापेक्षा अधिक रुपयांच्या पाचशेच्या नोटा लोकांनी गोळ्या केल्या होत्या. अर्थात या नोटा कुठून आल्या? कश्या आल्या? हे मात्र पोलिसांना देखील अजूनही कोडेच पडलेले आहे.
अर्थात या सर्व पाचशेच्या नोटा चलनामध्ये असलेल्या आणि खऱ्याच आहेत. त्यामुळे नागरिकांची ही गर्दी झाली होती. अर्थात एवढ्या नोटा सापडल्या असल्या, तरी नोटा घेऊन गेलेल्या लोकांना कोणीच काही बोलू शकले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे, मात्र या नोटा नेमका कुठून आल्या हे शोधणे मात्र तेवढेच आव्हानात्मक असणार आहे.











