काय काय घटना तर ऐकायला जरी मिळाल्या, तरी आश्चर्यचकित व्हायला होतं. काहीच उणं नसलेल्या पुण्यामध्ये येरवडा भागात घडलेल्या घटनेने तुम्ही देखील कपाळाला हात मारून घ्याल. जेवणात फक्त सांगितलेला मिरचीचा खर्डा दिला नाही म्हणून बायकोवर नवऱ्याने चाकूने वार केले.
या घटनेत 40 वर्षीय सुप्रिया पंकज पाचारणे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला. पंकज मच्छिंद्रनाथ पाचारणे असे या पतीचे नाव आहे. येरवडा भागातील नागपूर चाळ या ठिकाणी हा गुन्हा घडला. यातील सुप्रिया यांचा पती पंकज याचा रिक्षाचा व्यवसाय आहे. रविवारी संध्याकाळच्या वेळी रिक्षा चालवून तो घरी आल्यानंतर ही घटना घडली.
पंकजने घरी येण्यापूर्वीच जेवणात मिरचीचा खर्डा करून ठेव असे बायकोला सांगितले. त्यावर सुप्रिया हिने येताना मिरची घेऊन या, मी खर्डा करून देते असे सांगितले आणि त्यावरून पंकज चिडला. त्याने घरी पोचताच बायकोला मारहाण केली. जेव्हा त्याचा मुलगा मध्यस्थी करण्यास पुढे आला, तेव्हा मात्र त्याने मुलाला मारण्यासाठी स्वयंपाकघरातून चाकू आणला. हा चाकू मुलावर वार करण्याच्या नादात सुप्रिया हिला लागला आणि डाव्या डोळ्याजवळ चाकू खूप असल्याने तिला गंभीर दुखापत झाली.











