संदीप मापारी पाटील, बुलढाणा
शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणार मेहकर रस्त्यावर शारा या गावाने सराफ ही दुकानदाराला दुचाकी आडवी घालून दरोडेखोरांनी लुटले या झटापटीत तब्बल 27 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले.
ही घटना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शाळा गावाच्या नजीक असलेल्या गतिरोधकाजवळ घडली. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लोणार येथील सराफी व्यावसायिक आदित्य अजितकुमार संचेती यांना लुटले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
लोणार येथील आदित्य अजितकुमार संचेती (वय ४० वर्ष) यांचे सुलतानपूर येथे दर्शन ज्वेलर्स या नावाने सराफी दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी ५.३० वाजता दुकान बंद केले आणि ते लोणार येथे परत येत असतांना शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शारा येथील वळणावर चोरट्याने पाठलाग करत शाईन कंपनी ची गाडी आडवी लावली.
यानंतर ३ जणांनी मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत २७ लाख ३१ हजाराचे रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपये रोकड घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले, लेखनिक गणेश लोढे, विशाल धोंडगे, जमादार संजय जाधव, गोपनीय चे संतोष चव्हाण, विठ्ठल चव्हाण, बिट जमादार संतोष चव्हाण, अनिल शिंदे, गजानन डोईफोडे, गजानन दराडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आदित्य संचेती यांना चोरट्याने मारल्याने त्यांना मार लागला असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या नंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या सूचनेवरून उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी भेट देऊन घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
ही लाखो रुपयांची रोड रॉबरी असल्याने याचा तपास लावून तात्काळ आरोपी अटक करण्याचे फार मोठे आव्हान आहे. दरम्यान यासाठी पोलिसांनी काही पथकं तयार करून पाठवले असल्याची माहिती आहे. लवकरच या सर्व घटनेचा तपास लावून आरोपींना जेरबंद करू असे पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांनी सांगितले.
फिर्यादी आदित्य अजितकुमार संचेती यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम ३०९(४)३५१(२)३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले लेखनिक नितीन खरडे करीत आहेत.











