सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पक्षप्रवेशानंतर इंदापूर तालुक्यात बंडखोरीचे लोण पसरलेले असतानाच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे आजपासून (दि.13) जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात गावोगावी जनतेशी संवाद साधणार आहेत.
आज सकाळी 9 वाजता व्याहळी येथील भैरवनाथ मंदिर येथून दौऱ्यास प्रारंभ होईल. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अंकिता पाटील ठाकरे यांचा हा दौरा असेल. इंदापूर तालुक्यात येत्या काही दिवसात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांशी संवाद साधून जनमताचा अंदाज घेण्याचा या प्रयत्न असेल.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी देखील जाहीर केली. यानंतर लोकसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेल्या आप्पासाहेब जगदाळे व लोकसभा निवडणुकीनंतर प्रवेश केलेल्या प्रवीण माने यांनी बंडाचे निशाण फडकवले.
त्यांनी देखील मोठ्या सभा घेत उमेदवार बदलाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अंकिता पाटील यांनी मात्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दाखवून देत जनतेशी संवाद करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.











