विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती शहरातील जिजाऊ भवन या ठिकाणी व्यापारी व मर्चंट असोसिएशन च्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तुमच्याकडे कोणीही आले तर ते सांगतील ते ऐकून घ्या. पण बटन दाबताना घड्याळाचंच बटन दाबा. देशात स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली. तुम्ही फक्त घड्याळाचे बटन दाबा, पुढील पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा अजून चांगला करायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.
तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील,असं विधानही अजित पवारांनी केलं.पुन्हा मला येता येणार नाही.मला राज्यात फिरावं लागणार आहे.आता तुमची सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडा.
पुढे बोलताना पवार म्हणाले, पूर्वी पवारांकडून जेवणं मिळत नव्हती. काहीच मिळत नव्हतं. पवार भेटायलाही येत नव्हते. कुठे काय झालं तर मी कधीतरी भेटायचो. आता शहरात लोक फिरायला लागली, घमेली वाटायला लागली. साड्या वाटायला लागली. असं सगळं व्हायला लागलं आहे. त्या निमित्ताने पवार घरी यायला लागले हे बरं झालं ना. आता नावं माहित नसलं तरी मी ओळखते तुम्हाला ओळखते. तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवारही हसायला लागलाय. मिळतयं ते घ्या, सोडू नका पण घड्याळाला मतदान करा.
पुढे बोलताना पवार म्हणाले, माझे सहकारी मला विचारतात की, तुम्ही १ लाख ६८ हजार मतांनी निवडून येता. राज्यात एक नंबरच्या मतांनी सर्वांचेच डिपॉझिट जप्त करून विजय होता. आम्ही पण कॉलर उडून सांगतो की, १ लाख ६८ हजार मतांनी निवडून आलो आणि ते बारामतीकरांनी मला दिले. मात्र लोकसभेला ४८ हजारांनी धक्का कसा दिला.असे सहकारी म्हणू लागले. ‘की काय राव ही बारामती ‘.. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, बारा….बारा..मती… आहे. ती एक मती नाही ना..असा किस्साही अजित पवार यांनी सांगितला.
पुढे बोलताना पवार म्हणाले, पाच वर्षात मी जे बारामतीकरांसाठी केलं, ते यापूर्वीच्या कोणत्या टर्ममध्ये मला करता आलं नाही.तीन वर्षात बरचं काही करु शकलो. काही आमदार इथे येतात बघतात आणि म्हणतात आम्हाला तुमच्यासारखं करायचे आहे. बाहेरचे लोक कौतुक करतात. उदाहरण देतात की, इथं बारामती सारखा विकास करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.











