राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस स्टेशन परिसरात शिरूर तालुक्यातून दरोडयाच्या तयारीत आलेल्या पाच संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले. रात्रीच्या सुमारास झालेल्या थरारमध्ये एक तरुण पकडला गेला तर अंधाराचा फायदा घेऊन इतर चार जण पसार होण्यास यशस्वी झाले.
संबंधित चोरांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धू रसिकलाल चव्हाण, दीपक रसिकलाल चव्हाण (दोघेही राहणार इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे), प्रशांत फोट्या उर्फ बंडू काळे, हनुमंत फोट्या उर्फ बंडू काळे (दोघेही रा. राक्षसवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर), बाबुशा गुलाब काळे (रा. शेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित चोरांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि ४) रात्री साडेनऊच्या आसपास पाटस कानगाव रोडवरील पाटस रेल्वे स्टेशन परिसरात दोन मोटर सायकलीवर पाच जण धारदार हत्यारे, मिरची पुड घेऊन रेल्वे रुळाच्या कडेला असलेल्या झाडाझुडपात लपून बसले होते. यावेळी त्यांच्या हालचाली संशयित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना हटकले. यावेळी ग्रामस्थांना पाहून ते पळून जाऊ लागले.
त्यामुळे ग्रामस्थांचा संशय आणखीनच बळकावला आणि त्यांनी पाठलाग सुरू केला. ग्रामस्थांनी त्यांना पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. या झटपटीत एक जण पकडला गेला, तर बाकीचे चार जण अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडे लोखंडी कोयता, कुऱ्हाड, मिरची पावडर ची पुडी असल्याचं आढळून आले.
ग्रामस्थांनी त्वरित पाटस पोलिसांशी संपर्क साधला, क्षणाचा विलंब न करता पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सिद्धू रसिकलाल चव्हाण यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे यांनी फिर्याद दिल्याने पाच चोरांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.











