यशोगाथा बारामतीच्या सरकारी आरोग्य यंत्रणेची…कोरोनावर मात केलेल्यांची..!
बारामती : महान्यूज लाईव्ह
पंचाहत्तरी ओलांडलेल्या आईला आणि वयाची नव्वदी ओलांडलेल्या आजोबांना घेऊन एक मुलगा आणि एक नातू वेगवेगळ्या गावांतून सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात आले… दोघांचीही प्रकृती तशी गंभीर बनत चाललेली..डॉक्टरांनी तपासल्यानंतर परिस्थिती लक्षात घेतली आणि सारी धुरा खांद्यावर घेतली…फक्त घेतली नाही, ती यशस्वीरित्या पेलली देखील.. म्हातारी परवा घरी निघाली..डॉक्टरांना जवळ बोलावलं.. हात जोडले..ही ज्येष्ठ माणसं असतात ना… ती लहान मुलांसारखीच पापभिरू असतात.. निरागसपणा असतो..आणि आयुष्याच्या कातरवेळी आपल्यावर कोणीतरी उपकार करतंय म्हणून जगाचं कल्याण होण्याची मनिषादेखील त्यांची असते..डॉक्टरांच्या तोंडावर हात फिरवणारी ही माणसं सांगू लागली.. सरकारी दवाखाना भारी तर हायीच, पण डॉक्टर तुम्हीसुध्दा लय भारी हायेत..!!
कोरोनाच्या काळात सरकारी आरोग्य यंत्रणेची कसोटी लागली. मात्र या कसोटीला उतरण्यासाठी सरकारी डॉक्टरांनी देखील प्रयत्नांची पराकाष्टा केली. आजही करीत आहेत. म्हणूनच आजवर सरकारी यंत्रणेवर लागलीच बोट ठेवणाऱ्या व सरकारी यंत्रणाही उदासिनता दाखवते ही वस्तुस्थिती असणारी सरकारी आरोग्य यंत्रणा आजच्या जागतिक महामारीच्या काळात मात्र लोकांच्या पसंतीस, आशिर्वादास खरी उतरली आहे.
इंदापूर तालुक्यातील पुणे- सोलापूर राज्य महामार्गानजिकच्या एका गावातून एक ७५ वर्षाची वृध्द महिला धाप लागते, खोकला व ताप येतो म्हणून दवाखान्यात दाखल झाली. दवाखान्यात दाखल होतेवेळी तिची ऑक्सिजनची मात्रा ७० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात ही महिला दाखल होताच तिच्या तपासणी व अहवालावरून सारी परिस्थिती डॉक्टरांच्या निदर्शनास आली. काय करायचे हा प्रश्न काही क्षण समोर उभा राहीला. मात्र या वृध्देचा मुलगाही यावेळी तिच्यासमवेत होता. काहीही झाले तरी खासगी दवाखान्यात जायला लावू नका असे दोघांनीही सांगताच रुग्णलयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महेश जगताप, डॉ. निर्मलकुमार वाघमारे, डॉ. रणजित मोहिते यांनी उपचाराची धुरा खांद्यावर घेतली. उपचार सुरू झाले. त्यानंतर कोरोनाची तपासणी झाली. सुरवातीस निगेटिव्ह आलेली तपासणी नंतर पॉझिटिव्ह आली. सर्व प्रकारची इंजेक्शने देण्यात आली. वय जास्त असल्याने प्रकृती वेगाने ठिक होत नव्हती. मात्र तब्बल १२ दिवस प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतर या आजीने जीवघेण्या कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. डॉ. महेश जगताप व डॉ. वाघमारे यांना जवळ बोलावून मला तुम्हाला माझ्या घरी जेवण द्यायचंय असे सांगून दोन्ही डॉक्टरांना आजीने हात जोडले. ते हात पाठीवर आशिर्वाद म्हणून घेत दोन्ही डॉक्टरांनी यापुढे येणाऱ्या रुग्णांसाठी हाच आशिर्वाद असू द्या असे सांगत निरोप दिला. तेव्हा सरकारी दवाखाना तर भारीच आहे, पण डॉक्टर लय भारी आहेत असे म्हणत या मायलेकरांनी सिल्व्हर ज्युबिली दवाखान्याच्या पायऱ्या उतरल्या.
९२ वर्षाच्या आजोबांची कोरोनावर मात
याच दवाखान्यात इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याच्या शेजारील गावातील ९२ वर्षीय आजोबांना कोरोनाची लागण झाल्याने दाखल करण्यात आले. त्यांच्या एका नातूला त्रास सुरू झाल्याने आजोबांची चिंता वाढली. त्या कुटुंबातील आजोबांचे फार महत्व असल्याने चिंताग्रस्त असलेल्या कुटुंबातील सदस्य व जिल्हा स्तरावर सामाजिक संघटनेचा वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या नातवाने बारामतीतील नगरसेवक जयसिंह देशमुख यांच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क व संवाद सुरू ठेवला. डॉक्टरांनी आश्वस्त केले. फक्त तोंडी आश्वस्त केले नाही, तर जे आश्वस्त केेले होते, ते आश्वासन खरे करून दाखवत या आजोबांवरील उपचारही यशस्वी करून दाखवले. आता आजोबा ठणठणीत आहेत. सरकारी यंत्रणा खूप चांगले काम करते आहे याचा हा उत्तम उदाहरणाचा नमुना असल्याचे मत या पदाधिकाऱ्याने व्यक्त करीत सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे मनापासून आभार मानले.
प्लाझ्मा थेरपीही यशस्वी
छत्रपती कारखान्याच्या एका पदाधिकाऱ्यांच्या वडीलांस कोरोना झाला, त्यांच्यावर याच सरकारी दवाखान्यात यशस्वी उपचार झाल्यानंतर त्यांच्या मुलास म्हणजे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यासही कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा नजिकच्या मित्रांनी पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. तो सल्ला न मानता हे पदाधिकारी सिल्व्हर ज्युबीली शासकीय रुग्णालयातच दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. त्यांचीही प्रकृती उत्तम आहे. सरकारी दवाखान्यात सर्व प्रकारचे उपचार खूप चांगल्या पध्दतीने होत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तींयांनी व्यक्त केली.
या कोरोनाच्या महामारीच्या काळात खासगी दवाखाने अत्याधुनिक सुविधांमार्फत सेवा तर देतच आहेत, त्यांचेही मोठे योगदान आहेच, मात्र सरकारी यंत्रणा ज्या वेगवान पध्दतीने रुग्णांसाठी काम करीत आहे, ते कौतुकास्पद आहे. बारामतीसाठी अभिमानास्पद आहे. म्हणूनच तर याच दवाखान्यात एका रुग्णास बरे केल्यानंतर पणदरे येथील सिध्देश्वर संकुलाने या सरकारी दवाखान्यासाठी डिजीटल एक्स रे मशीन देत डॉक्टरांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे.










