पाटस येथील युवकाच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील एकावर गुन्हा!
दौंड, महान्यूज लाईव्ह
मी पैसे देऊन लष्कर मध्ये भरती झालो आहे. तुम्हाला पण लष्करमध्ये नोकरी लावतो असे म्हणून सहा युवकांकडुन लाखो रुपये उकळले. त्यांची तब्बल तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील एका तरुणावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. राहुल सुमंत गुरव (रा.देवी बाभुळगाव चौसाळा जिल्हा बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पाटस येथील संतोष बाळू पालवे हा बारावीनंतर फलटण येथील राजे छत्रपती अकॅडमी मध्ये सैन्य दलाची भरतीपूर्वी तयारी करत होता.
यावेळी त्याची राहुल गुरव याच्याशी मैत्री झाली. कोरोना महामारीच्या काळात अकॅडमी बंद असल्याने ती सन 2022 पुन्हा चालू झाली. त्यावेळी राहुल गुरव म्हणाला की, मी आसाम राज्यात नोकरी करत आहे. मी पैसे भरून सैन्य दलात भरती झालो आहे. तुम्हाला भरती व्हायचे असेल तर तुम्हाला देखील पैसे भरावे लागतील. राहुल याने यावेळी संतोष पालवे, अजय संजय खोमणे, दिनेश महादेव गदादे, शिवम भुजंग जाधव, नागनाथ जाधव, रितेश नाईकवाडे या सहा जणांना भरतीचे फोटो व ओळखपत्र दाखवले.
त्यामुळे तो खरच भरती झाला असल्याची त्यांची खात्री पडली. त्यावेळी त्यांनी त्यास सुरुवातीला थोडेफार पैसे दिले. त्यानंतर त्याने दिल्ली केंट बेस्ट हॉस्पिटल येथे जावा आणि मेडिकल करून घ्या असे सांगितले. 23 सप्टेंबर 2022 ला ते त्यांने दिलेल्या पत्त्यावर गेले. तिथे एका अनोळखी व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन अयोग्य तपासणी केली आणि प्रमाणपत्र सही शिक्कानिशी दिले. त्यामुळे या सहा जणांची आणखीनच खात्री पटली आणि त्यांनी टप्प्याटप्प्याने त्याला प्रत्येकी पाच लाख प्रमाणे असे तीस लाख रुपये दिले.
त्यानंतर नोकरीबाबत वारंवार विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन घेण्याचे टाळले. तुम्ही जर पोलीस तक्रार केली, तर मी तुमच्यावर खोटी तक्रार करून असे म्हणून शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या सहा जणांची खात्री झाली.याबाबत संतोष पालवे याने राहुल गुरव व त्याचे वडील सुमंत गुरव (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सोमवारी ( दि ३०) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाटस पोलीस करीत आहेत.











