विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : इंदापूर तालुक्यात विधानसभेला शरद पवार गटाकडून कोणाला तिकीट मिळणार याची राज्यभर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसापासून तुतारी हातात घेणार असल्याचा चर्चाही रंगल्या आहेत.
अशातच गोविंदबाग या निवासस्थानी आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शरद पवार गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. व आम्हाला आयात उमेदवार नको अशी मागणीही केली. यावेळी सोनाईचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली.
यावेळी बोलताना दशरथ माने म्हणाले, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे की, हा येतोय.. तो येतोय.. ह्याला तिकीट! जसं काय सगळं आपल्याच घरचं आहे. अशा प्रकारच्या भावना! सगळं माझंच आहे, इकडचं पण माझंच आहे, तिकडचं पण माझंच आहे. ते बी माझं आणि हे बी माझं… एवढं माने दादा बोलल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मग थोडं थांबून माने दादा म्हणाले, आम्ही काय करायचं? अरे या लोकांनी ज्यावेळी बुथ कमिटीची स्थापना झाली, त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला चारशे बूथ कमिट्या स्थापन करताना, बुथ कमिटीला कोण मिळत नव्हतं आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा. नाहीतर दुसरा पळवून न्यायचा. आम्हाला दोन सासू होत्या. दोन आम्हाला मोठे मोठे विरोधक होते.
त्या दोघांच्या तावडीतून कसतरी आम्ही जगून वाचून आलोय, आम्ही तंबूत बसलोय, तर आमचा तंबूच उचलून घेऊन चाललाय. आम्हाला तंबूत तरी बसू द्या की! ५२ सालापासून तुम्ही तंबूत बसताय. दुसरा दहा वर्ष झालं तंबूत बसतोय. आम्ही गोरगरीब माणसं. झोपडीत राहणारी माणसं! आमचे चांगले दिवस आलेत
साहेब लोकसभेपेक्षा इतकं स्फोटक वातावरण आहे. या महाराष्ट्रात तर आहेच आहे, पण इंदापूर तालुक्यामध्ये इतकं स्फोटक वातावरण आहे. कोणी जरी उमेदवार असला, उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे. तुम्ही आयतं ताट वाढलेलं आता आम्ही खायला बसलोय आणि आता तुम्ही म्हणताय थांब जरा. किती दिवस थांबायचं? आम्ही या सर्व सर्वसामान्यांच्या भावना आहेत. या भावना माझ्या नाहीत.असे दशरथ माने म्हणाले.
पुढे बोलताना माने म्हणाले, गेल्या वर्षी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या. या ठिकाणी खाली बसलेले सर्व कार्यकर्ते, गोरगरीब, सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी सोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी इतक मोठ्या प्रचंड प्रमाणावर काम केलं. त्यांच्या ह्याच भावना होत्या आणि आम्ही सगळे त्यांना सांगत होतो की, आपले दिवस चांगले येणार आहेत. आता सुप्रिया ताई निवडून येणार आहेत. आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने आपले चांगले दिवस सुरू झाले आहेत.
तुम्ही तुतारीच काम करा. तुम्हाला कुठेतरी जिल्हा परिषद मिळेल, पंचायत समिती मिळेल,पवार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो सर्व सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य होईल, पंचायत समिती सदस्य होईल, डायरेक्टर होईल असं आम्ही सगळ्यांना सांगून एवढी मोठी गोरगरीब फळी प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, काही झालं आणि कुणीही समोर उमेदवार असला, दुरंगी झाली, तिरंगी झाली तरी, या पाच उमेदवार मधला उमेदवार ४० ते ५० हजार मतांनी निवडून येईल. तरी आमची आग्रहाची विनंती आहे आपण चुकीचा निर्णय घेऊ नका. अशी विनंतीही दशरथ माने यांनी शरद पवार यांना केली.











