राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड भाजप आमदार आणि भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात हे पुन्हा एकदा एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या आज शनिवारी (दि २८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेला माजी आमदार रमेश थोरात हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी कूल – थोरात एकमेकांना समोरासमोर भिडणार आहेत.
अर्थात ही सभा वादळी अथवा वादग्रस्त ठरणार? की पेल्यातील वादळ राहणार याकडे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दौंड तालुक्यातील एकमेव असणारा सहकारी आणि सध्या २५ वर्षाच्या भाडेतत्त्वावर कर्नाटकच्या निराणी ग्रुपला चालवायला दिलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४२ वी सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर पार पडणार आहे.
या सभेची पूर्ण तयारी भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने केली आहे. मागील वर्षी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेला माजी आमदार रमेश थोरात हे कारखाना स्थळावर आले आणि गेटवर आंदोलन करुन निघून गेले. त्यामुळे अनेक ऊस उत्पादक सभासदांनी थोरात यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी विविध मुद्द्यांवर कारखान्याच्या संचालक मंडळांना जाब विचारला होता.
मागील अनेक वर्षापासून भीमा पाटस कारखान्याच्या विविध प्रश्नांवर न्यायालयीन लढा देणारे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनीही कारखान्याच्या संचालक मंडळाला विविध प्रश्न उपस्थित करत धारेवर धरले होते. मात्र शनिवारी (दि २८) होणारी सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही सभा होणार असल्याने राजकीयदृष्ट्या याकडे पाहिले जाणार आहे.
भीमा पाटस कारखाना हा २५ वर्षासाठी भाडेतत्त्वावर करारावर कर्नाटकच्या निराणी ग्रुपला चालवायला दिला असून सध्या मे. साईप्रिया शुगर प्रा.लि. जमखंडी जिल्हा बागलकोट (मे. एम आर एन भीमा शुगर अँड पॉवर प्रा.लि. ) या नावाने सुरू आहे. दरम्यान हा कारखाना खाजगीकरण केला असल्याचा आरोप अनेक ऊस उत्पादक सभासद करीत आहेत.
दुसरीकडे हा कारखाना भाडेतत्त्वावर जरी चालवण्यासाठी दिला असेल तरी हा कारखाना सहकारी असून कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नियंत्रण खाली चालू असल्याचा दावा कारखान्याचे संचालक मंडळ करीत आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा या सर्वसाधारण सभेत उपस्थित होऊ शकतो. या सभेला माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, नामदेव ताकवणे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाला धारेवर धरणार का ? हे पाहावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड मध्ये भाजपा आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांना एकाच व्यासपीठावर आणले होते.
एकमेकांना पेढा भरवीत त्यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार ही केला होता. अवघ्या दोन महिन्यातच पुन्हा एकदा आमदार कुल आणि रमेश थोरात एकमेकांचे राजकीय विरोधक बनले आहेत. रमेश थोरात यांनी आगामी विधानसभेसाठी महायुतीतून बंडखोरी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा रमेश थोरात यांच्या उपस्थितीमुळे गाजणार का हे पाहावे लागणार आहे.
विरोधकांचे तगडे आव्हान कारखान्याच्या संचालक मंडळासमोर असणार आहे. त्यामुळे भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या ४२ व्या सर्वसाधारण सभेकडे ऊस उत्पादक सभासद दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधारण सभेचा वार्षिक अहवाल अनेक सभासदांना अद्याप पोहोचला गेला नाही. तो जाणून बुजून पोचवला नाही असा आरोप शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास सोनवणे यांनी केला आहे.
सभेचा वार्षिक अहवाल हा पंधरा दिवस अगोदर सभासदांच्या हातात मिळाला पाहिजे. मात्र दोन दिवस अगोदर हा अहवाल सभासदांना मिळाला आहे. काहींना अद्याप अहवाल मिळाला नाही. कारखान्याच्या संचालक मंडळांना तो जाणून-बुजून देणे टाळले आहे. यासंदर्भात कारखान्याच्या संचालक मंडळाने खुलासा करावा अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. या संदर्भात कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.











