इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या इंदापूर शाखेत तब्बल आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुणे जिल्हा बँकेचा माजी संचालक अविनाश घोलप याच्यासह बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक लक्ष्मण राठोड आणि करमाळ्यातील व्यावसायिक हनुमंत साळुंखे या तिघांना तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली आहे.
या गैरव्यवहाराच्या प्रकरणात सीबीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने राठोड याला दीड लाख रुपयांचा तर घोलप आणि साळुंखे या दोघांना प्रत्येकी 95 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तो दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. सीबीआय च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनीही शिक्षा ठरवली आहे. दरम्यान शिक्षा सुनावल्यानंतर जामिनावर या तिघांची मुक्तता करण्यात आली.
हे प्रकरण नेमके काय होते? इंडियन ओव्हरसीज बँकेतील तत्कालीन वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक एस के श्रीवास्तव यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणात सीबीआय ने केलेल्या तपासात तब्बल दीड हजार पानांचे आरोप पत्र दाखल करण्यात आले होते. जुलै 2013 ते जुलै 2016 या तीन वर्षांच्या कालावधीत हा गैरव्यवहार झाला होता.
यामध्ये लक्ष्मण राठोड याने इंडियन ओव्हरसीज बँकेतील खातेदार असलेल्या 41 शेतकऱ्यांच्या खात्यावरून कृषी हरित कर्ज व किसान क्रेडिट कार्ड योजनेचे 7.74 कोटी रुपयांचे कर्ज या शेतकऱ्यांची संमती न घेता अविनाश घोलप आणि हनुमान साळुंखे या दोघांच्या खात्यात वर्ग केले होते. याच पैशातील दीड कोटी रुपयांचे कर्ज दूधगंगा सहकारी दूध उत्पादन संघाच्या खात्यावर वर्ग करून ते पुन्हा अविनाश घोलप याच्या खात्यावर वळवले होते.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अभयारिकर आणि प्रकाश कुमार सोनी यांनी काम पाहिले त्यांनी 18 साक्षीदार तपासले हा सामाजिक आर्थिक गुन्हा असल्याचा एकतीवाद या वकिलांनी करत आरोपींनी फक्त बँक नव्हे तर सरकारचे कोट्यावधी रुपयांची नुकसान केले आहे असा एक किंवा केला होता त्यांना कठोर शिक्षा आणि दंडाची शिफारस मागणी त्यांनी केली होती.











