लक्ष्मण जगताप, बारामती
मुलांचा वाढता स्क्रीन टाइम ही आजच्या पालकांपुढील खूप मोठी समस्या बनली आहे. अन्न, वस्र, निवारा याप्रमाणेच मोबाइल ही माणसाची मूलभूत गरज बनली आहे. आज घरात जेवढी माणसं आहेत, तेवढेच मोबाइल पहायला मिळतात. प्रत्येकाला स्वतंत्र मोबाइल असल्याने प्रत्येकाचा स्क्रीन टाइम वेगवेगळा आहे. वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शारीरिक हालचाली कमी होत असल्याने विविध आजारांचा धोका वाढत आहे.
लहान मुले खात नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाइल दिला जातो म्हणजे खाण्यासाठी मोबाइलचे अमिष दाखवावे लागते अशी परिस्थिती आहे. जेवताना मुलांनी त्रास देऊ नये, कामात व्यत्यय आणू नये म्हणून लहान मुलांना खेळण्यासाठी मोठी माणसेच हातात मोबाइल देतात. जेणेकरुन काही काळ मुले मोबाइलमध्ये रमतील आणि आपल्याला जरा निवांतपणा मिळेल. खरं तर इथेच आपण मोठी चूक करतो आणि लहान मुलांना मोबाइलच्या आहारी जाण्यास हळूहळू भाग पाडतो आणि नंतर आपणच तक्रार करतो, मुलं आमचं ऐकतच नाहीत. त्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे.
जगातील अनेक देशात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम ही मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होते. अभ्यासात लक्ष लागत नाही. जेवणाकडेही नीट लक्ष दिले जात नाही. एकंदरीत मुले स्वमग्न बनतात. मोबाइल आणि आपल्याच विश्वात रममाण होतात.त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीने हे धोकादायक आहे.
स्वीडन या देशाने मुलांच्या स्क्रीन टाइमबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. दोन वर्षापर्यंतच्या मुलांना नो स्क्रीन टाइम असा नियम केला असून वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना स्क्रीन टाइम ठरवून दिला आहे.तेवढाच वेळ मुलांनी स्क्रीनसाठी द्यायचा अशा सूचना पालकांना दिल्या आहेत. मुलांच्या दृष्टीने अतिशय चांगला असा हा निर्णय असून जगभरातील अनेक देशांनी याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.
जगभरातील पालकांनी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. मुलांना स्क्रीन टाइमपासून वाचवले तरच ही निरागस बालके शरीराने आणि मनाने सुदृढ बनतील. अन्यथा या मुलांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतील. यासाठी पालक म्हणून प्रत्येकाने दक्ष राहून आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम किती आहे? तो कसा कमी करता येईल? मुलांना अन्य गोष्टीत कसं गुंतवून ठेवता येईल? याचा विचार करावा आणि त्यादृष्टीने पर्याय शोधावेत. जेणेकरुन मुले स्क्रीनपासून दूर राहतील.
मैदानावरील खेळ, चित्रे, कागदकाम, नृत्य, गायन, वादन अशा आनंद देणाऱ्या आणि विविध कौशल्ये वृद्धींगत होणाऱ्या गोष्टीत मुलांची गोडी कशी वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.











