उजनी धरणात कुगाव ते आगोती असा संध्याकाळच्या वेळी प्रवास करताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली आणि एका लहान मुलासह सहा जणांचा जीव गेला होता. 21 मे 2024 रोजीची ती घटना.. या घटनेमध्ये एक निष्पाप कुटुंब जीवनिशी गेले. खरंतर ही बोट अनधिकृतरित्या चालत होती, मात्र त्यावर बोलायला कोणीच तयार नव्हते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष तुषार झेंडे पाटील यांनी यासंदर्भात सरकारकडे व मानवाधिकार आयोगाकडे पाठपुरावा केला आणि त्याची दखल घेत सरकारने मृताच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तुषार झेंडे पाटील यांनी या घटनेबाबत जबाबदार असलेल्या जलसंपदा व महसुली विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करावी अशा स्वरूपाची मागणी 23 मे रोजी केली होती.
त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्य सचिवांनी सहापैकी चार व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत दिली असून, उर्वरित दोन लहान मुलांच्या वारसांना अनुदान द्यायचे किंवा कसे याबाबत विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. राज्याच्या अवर सचिव सोनल गायकवाड यांनी यासंदर्भात तुषार झेंडे यांना या संदर्भातील लेखी माहिती दिली आहे.
दरम्यान बोट चालकांनी अनधिकृत प्रवासी वाहतूक करणार नसल्याबाबत पोलीस निरीक्षकांना कबूल करून सुद्धा पुन्हा अनधिकृत जलप्रवासी वाहतूक केल्याने ही घटना घडली. या घटनेस संबंधित लॉन्च, बोट चालक व मालक हे पूर्णतः जबाबदार आहेत. या दुर्घटनेनंतर जलसंपदा विभाग महसूल विभाग व पोलीस यांनी संयुक्त कार्यवाही करून उजनी जलाशयातील प्रवासी वाहतूक पूर्ण बंद केली आहे, तसेच यापुढे देखील अशा प्रकारची अनधिकृत जलप्रवासी वाहतूक करणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचे आश्वासन अवर सचिवांनी दिले आहे.











