डेंगू, चिकनगुनिया गेल्यावर्षीही होता. त्याच्या आधीच्या वर्षीही होता. चिकनगुनियाच्या रुग्णांना चिकनगुनिया झाल्यानंतर सांधे दुखतात. अगदी काही कालावधीपर्यंत हे सांधे दुखतात असे डॉक्टरही सांगतात. यावर्षी मात्र चिकनगुनियाने जो हाहाकार उडवला आहे. त्यामुळे फक्त रुग्णच नाही तर डॉक्टर देखील चक्रावले आहेत.
यावर्षी चिकनगुनिया चा आजार झालेल्या रुग्णांना जीवघेणी लक्षणे दिसू लागले आहेत. चिकनगुनियाच्या विषाणूचा नव्याने अभ्यास करण्याची मागणी त्यामुळेच होत असून फक्त सांधेदुखी आणि ताप एवढीच लक्षणे असलेला चिकनगुनिया आता अर्धांगवायू तसेच न्युमोनिया, पोटात पाणी होण्याचा आजार, प्लेटलेट एकदम धोकादायक पातळीपर्यंत घसरणे अशी लक्षणे आढळू लागली आहेत.
याचबरोबर चिकनगुनियाच्या काही रुग्णांना उलट्या आणि गॅस्ट्रो सारखी लक्षणे देखील दिसू लागले आहेत. अशी लक्षणे यापूर्वी दिसत नव्हती, असे डॉक्टर देखील सांगू लागले आहेत. चिकनगुनिया झालेल्या रुग्णांची प्लेटलेट्सची संख्या अगदी 40 हजारापर्यंत कमी होताना दिसत आहे. असे कधीही यापूर्वी अनुभवले जात नव्हते. डेंगीची लक्षणे चिकनगुण्याच्या रुग्णांमध्ये दिसून आल्याने डॉक्टर देखील संभ्रमात आहेत.
पुण्यातील डॉक्टरांनी तर चिकनगुनियाच्या नवीन व्हेरीयंटला नव्याने संशोधित करण्याची गरज व्यक्त करत राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे मागणी देखील केली आहे. दरम्यान अनेक चिकनगुनियाच्या रुग्णांना ज्यामध्ये इतर आजारही यापूर्वी आहेत, अशा मधुमेह किंवा रक्तदाबाचे विकार असलेल्या चिकनगुनियाच्या रुग्णांना धोकादायक लक्षणे दिसू लागली आहेत.











