दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
उसतोड कामगार पुरवतो असे सांगुन वाईतील ऊस वाहतुकदारांची २० लाख ४ हजार रुपयांची फसवणुक करणारा बीडमधील मुकादम अनिल बंडु धोत्रे यांस वाई पोलिसांनी अटक केली असून त्याला वाई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल बंडु धोत्रे (रा. टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड) याने वाईमधील संतोष जायगुडे व विजय जामदाडे (रा. वाई) या ऊस वाहतुकदारांना मी मुकादम आहे, तुम्हाला उसतोड कामगार पुरवतो असे सांगुन तसा करार करुन २० लाख ४ हजार रुपये इतकी रक्कम घेतली. मात्र कराराप्रमाणे उसतोड कामगार न पुरवता उस वाहतुकदारांची २० लाख ४ हजार रुपयांची फसवणूक केल्याने वाई पोलीस ठाणे येथे यातील आरोपी अनिल बंडु धोत्रे याच्यावर गुन्हा नोंद
करण्यात आला होता.
त्याप्रमाणे यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वाई तपासपथक हे टाकरवन बीड येथे गेले असता आरोपीने सदर ठिकाणाहुन पळ काढला होता. तेव्हापासुन तो नाव व पत्ता बदलून नियमीतपणे राहण्याचे ठिकाण बदलत होता. दिनांक १२ सप्टेंबर रोजी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना आरोपी हा डिग्रजवाडी (ता. शिरुर जि. पुणे) येथे राहत असल्याची माहिती समजली.
या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन वाई तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांच्या पथकास सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने त्यांनी डिग्रजवाडी येथे सापळा रचुन त्यास जेरबंद
केले. त्यास अटक करुन वाई न्यायालयात हजर केल्यानंतर वाई वाई न्यायालयाने त्यास ४ दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर आरोपी याने अशाच प्रकारची इतर ठिकाणी देखील फसवणुक केल्याची शक्यता असल्याने त्याच्याकडे कसून तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.कॉ. राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली.











