पुणे : महान्यूज लाईव्ह
हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ या गावात काल एका शेतकऱ्यावर गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका बड्या उद्योजकाचा व त्याच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
परिसरातील उद्योजक बापू उर्फ दशरथ शितोळे याच्यासह त्याचा मुलगा जिग्नेश शितोळे व बायको नीलिमा शितोळे या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नाव व पत्ता माहीत नसलेल्या महिलेसह निखिल भोसले व अक्षय भोसले या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत काळूराम गोते या शेतकऱ्यावर गोळीबार करण्यात आला, तर त्याचा चुलत भाऊ शरद गोते याला या घटनेत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शरद गोते यांनी उरळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गोते व शितोळे यांचे आर्थिक व्यवहार होते ते दोघेही एकमेकांशी परिचित असून बापू शितोळे याच्याकडून चाळीस लाख रुपयांचे येणे होते. त्यासाठी शरद गोते हा बापू शितोळे याच्या घरी गेला होता.
मात्र पैशातून वाद झाला आणि बापू शितोळे याने शरद गोते याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र यात गोळी लागून काळुराम गोते हा जखमी झाला. दरम्यान नीलिमा शितोळे व जिग्नेश शितोळे, अक्षय भोसले व निखिल भोसले या चौघांनी शरद गोते ला मारहाण केली व एका महिलेने गोळीबारानंतर पडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून उरळीकांचन पोलीस ठाण्यात सहा जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.











