बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मध्यवर्ती सभागृह उद्घाटन कार्यक्रम झाला या कार्यक्रमावरून आता राजकारण सुरू झाले असून खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची नावे नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शासनाच्या वतीने मध्यवर्ती सभागृह उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असल्याचे बॅनरवर नमूद केले होते. या कार्यक्रमाचा बॅनर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत वरील नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी नमूद केले आहे की, शासनाच्या वतीने हा कार्यक्रम झाला ही आनंदाचे बाब आहे. या कार्यक्रमाचा बॅनर पाहिला असता आश्चर्य वाटले. या बॅनरवर आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार आणि माझे नाव नाही. यासोबत आदरणीय पवार साहेब व मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील नाही.
निमंत्रण असते तर आम्ही दोघेही आनंदाने कार्यक्रमाला आलो असतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचे दिसते. यामध्ये जी नावे नमूद आहेत, ती नेमकी कोणत्या प्रोटोकॉल मध्ये बसतात? हे समजत नाही. हा देश संविधानावर चालतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने प्रोटोकॉलचा नियमांमध्ये काही बदल केले असतील, तर आम्हाला कृपया अवगत करावेत असे सुळे यांनी नमूद केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी नमूद केल्यानुसार या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, विभाग प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे व डॉ. विवेक सहस्रबुद्धे यांची नावे आहेत.











