मुंबई : महान्यूज लाईव्ह
केंद्र सरकारने अखेर पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकर च्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असतानाच केंद्र सरकारने तिला बडतर्फ केले आहे. दरम्यान अशा पद्धतीने यूपीएससी बडतर्फ करू शकत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद तिच्या वकिलाने केला होता. मात्र आता केंद्र सरकारनेच चुकीच्या पद्धतीने दिव्यांग आणि ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेतला म्हणून पूजा खेडकर ला बडतर्फ केले आहे.
पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून 3 जून रोजी पुण्यामध्ये रुजू झाल्या, मात्र या दरम्यान त्यांनी वेगळी केबिन वेगळा शिपाई अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवला होता. तेवढ्यातच त्यांच्या गाडीचे प्रकरण देखील सगळ्यांच्या चर्चेत आले. सोशल मीडियातील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव कोकाट यांच्या ट्विटने साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले. वैभव कोकाटे यांच्यामुळे पूजा खेडकर यांच्या नियुक्तीचे सारे गौडबंगालच बाहेर पडले.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल सादर केल्यानंतर त्यांची बदली वाशिमला करण्यात आली. मात्र त्यानंतर बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या. पूजा खेडकर यांनी अनेक नावाने यूपीएससी परीक्षा दिल्याचे देखील उघड झाले पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला हेही समोर आले त्याचबरोबर अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सगळ्या घडामोडीत पूजा खेडकर हिच्यावर दिल्लीत गुन्हा देखील दाखल झाला.
याची केंद्र सरकारने देखील गंभीर दखल घेत एक समिती स्थापन केली पूजा खेडकरच्या कागदपत्रांची पडताळणी करत 24 जुलै रोजी या समितीने अहवाल सादर केला आणि पूजा खेडकर हिला प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दरम्यान 18 जुलै रोजी यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि 30 जुलैपर्यंत तिला बाजू मांडण्यास मदत देण्यात आली होती. यादरम्यान युपीएससीकडे व सरकारकडे पूजा खेडकर प्रकरणात तब्बल 30 तक्रारी दाखल झाल्या होत्या.
त्यानंतर पूजा खेडकर हिच्या वकिलाने एकदा यूपीएससीने आयएएस केल्यानंतर यूपीएससी ला आयएस पदावरून बडतर्फ करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते, मात्र आता 6 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागाने म्हणजेच कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थी नियम 1954 च्या कलम 12 नुसार पूजा खेडकर हिच्यावर बडतर्फीची कारवाई केली.
नियम 12 नुसार केंद्र सरकारला परिविक्षाधीन पदावर असलेल्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा अधिकार असल्याने पूजा खेडकर हिच्या वकिलाने केलेला युक्तीवादास आता काहीच अर्थ राहिलेला नाही.











