नानाची टांग
दुखणं झालं स्वस्त अन महाग झालंय जगणं,
रोजच्या रडण्याला विसरावं म्हणतो..
मी एकदा सरकारच पाडावं म्हणतो…
मोडून पडला रोजगार, मोडली जरी शेती..
तरी खंबीर होऊन लढावं म्हणतो..
एकदा मी सरकारच पाडावं म्हणतो…
कळंत नाही, या सरकारमध्ये दडलंय तरी काय?
उसनवारीचं जगणं जरा आळशीपणा समजतो..
धीट होऊन जरा रस्त्यावर उतरावं म्हणतो
मी एकदा सरकारच पाडावं म्हणतो..
कंगना, शर्मा, अन गव्हर्नरचीही भीती राहीली नाही..
आमच्या अफाट ताकदीची काही गरजच उरली नाही?
आमचा कसा असतो हिसका, दाखवावा म्हणतो..
मी एकदा सरकारच पाडावं म्हणतो..
सरकारीत नाही सुविधा, खासगी खिसा कापतो..
दवाखान्यांमधला ऑक्सिजन काढून फेकावा वाटतो..
तुमच्या जिवंतपणाचा काटा ऑक्सिजन दाखवतो..
रक्तात आमच्या अर्थ आता उरलेला नसतो..
मग मी एकदा सरकारच पाडावं म्हणतो…
सरकार पडलं की माझंच सरकार उभारावं म्हणतो..
मग माझाच राजा, माझंच दल उभारावं म्हणतो..
कसली शेती, कसला बळीराजा, दैन्य सरेल सांगतो..
म्हणून मी एकदा सरकारच पाडावं म्हणतो..
कंत्राटाच्या शेतीत उद्योग उभारावा म्हणतो..
दररोजच्या भाव मागणीला मी गरीबी समजतो..
नाहीच राहीली शेती, तर बळीराजा तरी काय करतो…
म्हणून तर मी सरकारच पाडावं म्हणतो..
६० वर्षात झालेला विकास हा भिकारचोटपणा…
घरातलं जुनं फर्निचर विकावं म्हणतो..
शेतीला देऊ गिलावा, त्याला कंत्राटी शेती म्हणतो..
विकास कसला मागता, मी सरकारच पाडतो..
बॅंकांमधली नादारी कमी करायचीय मला,
बॅंकाचा अधिकारी जरा मुजोर वाटतो..
ठोकून काढावं साल्यांना, इर्षा मी बाळगतो..
म्हणून तर मी सरकार पाडावं म्हणतो..
सरकार, सरकार शेवटी असतं तरी काय?
दोन मंत्री, अधिकाऱ्यांचं टेबलाखाली पाय..
मंत्रालयात धर्मा पाटील उडी मारून बघतो..
अशी सरकारं मी पाडावी म्हणतो..
खरंच सामान्यांचं असतं का हो सरकार…
कोणी आला तरी तोच असतो कंत्राटदार..
तीचं कामं, तोच तांदूळ, भ्रष्ट असतो शिष्टाचार..
अशांना बुक्कीत टेंगूळ काढावा वाटतो..
मी तर असले सरकारच पाडावं म्हणतो..
नोकरांना लाख रुपये, बळीराजा असतो नादार..
दुकानांतल्या उधारीला मालक सुध्दा लाचार..
रोगराई येते, अन माणूस पटकन मरून जातो..
माणसाला वाळीत टाकणारं सरकारच पाडावं म्हणतो..
योजनांचा पाऊस अन हातात थेंबही नाही..
असल्या सरकारी योजनांना गाडावं म्हणतो..
दोन रुपयांचा कांदा ५० रुपयांना विकावं म्हणतो..
कांद्याचाच नाही, जीवनाचा झाला वांदा,
मी असलं दळभद्री सरकारच पाडावं म्हणतो..
७ व्या वर्षाच्या बलात्काराचा निकाल ७० व्या वर्षी लागतो..
म्हणून मनसोक्त एकदा कोर्टाचा अपमान करू म्हणतो..
केलाच तर एक रुपया दंड भरावा म्हणतो…
पारावरचा न्याय बरा, असलं कोर्ट बरखास्त करावं म्हणतो..
माहीती आहे, माझी नाही ऐपत ही…
एका एका क्षुद्राला कुठं कोण मोजतो..
लोकशाहीत डोक्यापेक्षा डोकी मोठी समजतो..
वेडा ठरतो बुध्दीवंत अन फोडणारा राज्य करतो..
मी असलं खुळं सरकार पाडावं म्हणतो..
मला नाही काहीच ताकद..बाहूत देखील बळ नाही..
माझ्या या किंचाळण्याला काहीच किंमत नाही..
तरीदेखील उसनं अवसान आणू पाहावं म्हणतो..
एका एका मतानं सरकार पाडावं म्हणतो…!










