मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष यामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असले, व त्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे देखील अग्रभागी असले, तरी देखील जितेंद्र आव्हाड यांनी आज एक गौप्यस्फोट करत अजित पवारांची बाजू उचलली आहे. अर्थात मंत्रिमंडळाची वादाची इनसाईड स्टोरी सांगताना, त्यांनी अजित पवारांच्या वतीने कोणीच बोलत नाही, कारण त्यांच्याकडे बोलायला कोणी उरलेच नाही असा देखील टोला मारला आहे.
महायुतीमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मिठाचा खडा पडला आहे तानाजी सावंत यांनी महायुतीत अजित पवारांच्या सोबत केलेली युती यावर भाष्य करताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसल्यानंतर तेथून उठून बाहेर आल्यावर उलटी होते अशा स्वरूपाचे वक्तव्य केले आणि वादाला सुरुवात झाली अमोल मिटकरी उमेश पाटील व संजय तटकरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला तर तानाजी सावंत यांची बाजू त्यांच्याच पक्षाचे आमदार संजय शिरसाठ यांनी उचलून धरली यातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष यांच्यात मतभेद असल्याची दिसून आले.
मात्र त्यावर अजित पवारांनी कोणतेही भाष्य केले नाही, आज मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या वादाची इनसाइड स्टोरी सांगत गौप्यस्फोट केला. तानाजी सावंत यांनी मांडलेला तीन लाखाची गाडी तीस लाखाला घेण्याचा मुद्दा अजित पवारांना पटला नाही. त्यांनी अशा प्रकारची खरेदी करता येणार नाही, असे निक्षून सांगितले आणि त्यामुळेच तानाजी सावंत यांना उलटी आल्याचा साक्षात्कार झाला असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अर्थात ही बाजू बाहेर सांगायला हवी होती, परंतु दुर्दैवाने अजित पवारांच्या बाजूकडून कोणीच बोलायला पुढे आले नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.











