पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील संगमवाडीच्या नदीपात्रात पावसाच्या काळात डोकं नसलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. 26 ऑगस्ट रोजी हा डोकं नसलेला मृतदेह पुण्यातील मोठा नदीत वाहत आला आणि सगळीकडे खळबळ उडाली. पण पुण्याचे पोलीस भारीच आहेत. त्यांनी या शीर नसलेल्याचाही शोध लावला आणि त्याच्या खुन्यांचाही!
झोपडपट्टीतील खोलीच्या मालकीच्या वादातून सख्ख्या भावाने आणि भावजयीने सकीना खान या महिलेचा मृतदेह केला. धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि पुण्यातील पावसाच्या काळात तो मृतदेह नदीत टाकून सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली.
मात्र सकीना खान ही गावी जाणे शक्यच नाही असे वाटल्याने नातेवाईकांना व शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळवले. शिवाजीनगर पोलिसांना कळवल्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळा मुळा नदी पात्रात 26 ऑगस्ट रोजी एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा स्त्रीचा मृतदेह असून धड आणि हात पाय नसलेल्या अवस्थेत हा विवस्त्र मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी परिसरात बेपत्ता असलेल्या लोकांचा या घटनेची संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. बेपत्ता तक्रारी शोधल्या, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले, त्यामुळे हा मृतदेह कोणाचा याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिवाजीनगर पोलिसांनी मात्र यामध्ये लक्ष घातले.
एकूणच पुण्याच्या पोलिसांनी यात पुढाकार घेत ती सकीना खानच आहे का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तपासात पुण्यातील पाटील इस्टेट भागातील खोलीच्या मालकीतून हत्या झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही खोली सकिनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ आणि भावजय तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते, मात्र ती गेली नाही म्हणून तिचा खून करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी सकीना खान हिच्या भावाला व भावजयीला अटक केली आहे.











