छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
मोठे तितके खोटे.. बडा घर पोकळ वासा या म्हणी उगीच केलेल्या नाहीत.. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या डॉक्टर प्रतीक्षा गवारे या 28 वर्षीय स्त्रीरोगतज्ञाने चारित्र्याच्या संशयाला व नवऱ्याच्या छळाला कंटाळून केलेली आत्महत्या महाराष्ट्राला चटका लावून गेली. या स्त्रीरोगतज्ञ महिलेने लिहिलेलं सात पाणी पत्र वाचलं, तर डोळ्यातून आपोआप पाण्याच्या धारा निघतील. एवढा त्रास होऊनही जर माझ्याविषयी थोडे जरी प्रेम असेल, तर चितेवर माझ्या प्रेताला घट्ट मिठी मारा अशी अपेक्षा तिने केली आहे. अर्थात प्रतीक्षा हिचा नवरा घडलेल्या घटनेपासून फरार आहे.
काळजाला चरे पाडणारे प्रतीक्षाचे हे पत्र संवेदनशील मनाला आणखीनच संवेदनशील करून टाकेल. या पत्राची सुरुवातच करताना तिने डीअर आहो असे म्हटले आहे. डिअर अहो, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड केलं. स्वत:ला विसरून गेले तुमच्यासाठी, माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी, अॅम्बिशीअस मुलीला डिपेंडंट बनवले तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन तुमच्याशी खूप लग्न केलं होतं की हे मला जीव लावतील काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना, त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं जर तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती.
तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं, मी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आई-वडिलांशी भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांनाही नव्हते बोलत जास्त. पण तरीही तुमचं पोट भरत नाही. मोबाईल बदल म्हणाले नंबर बदल म्हणून वाद घातले. त्यासाठी पण तयार झाले .पण तुमचे डाऊट काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते, आहे आणि राहीन. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.
माझ्या मनीचे दुःख सारे,कधी तू जाणवलेच नाही. पावसात लपणारे अश्रू माझे, तुला कधी दिसलेच नाही.. तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास, तू कधी पाहिलेच नाही. तुझ्यासाठी झटणारे हातांना, तू कधी चुंबले नाही..
नशीब बांधले होते आपले, नाही त्यात षडयंत्र काही.. हा पण प्रेम होते आणि आहे! दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही, मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही, तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही..
तुझ्याच पासून सुख माझे, तुझ्यासाठी सर्व काही. मी स्वतःला हरवून आले, याचे मजला दुःख नाही, तू फक्त जपावे मला, याहून जास्त अपेक्षा नाही.. तुझ्यासाठी मी सगळं करेल, यात काही शंका नाही..
माझे जे आहेत, ते तुम्हीच आहात. तुमच्या बायकोची जागा भेटली, पण तुमच्या हृदयात मला कधीच जागा नाही दिली तुम्ही. मी खूप हळवी आहे हेच विसरलात. असं म्हणतात, चारित्र्य महिलेचा सर्वात मोठा दागिना असतो आणि तुम्ही नेहमी त्यावरच चिखल फेकला. सतत संशय संशय… मी खूप वैतागले होते. लग्नापासून मी तुमच्या अशा वागण्याने डिप्रेशनमध्ये गेले, म्हणून सतत मला आपोआप रडू यायचं. पण तुम्हाला मी रडकी वाटायचे, गांडू नशिबाची वाटायचे, आणि खरंय, तुमचं प्रेम तुमच्या आयुष्यातून गेल्यापासून आणि मी आल्यापासून तुमचा बॅड लकच सुरु झाला. आज त्यातून तुमची सुटका होईल.
तुम्हाला लावलेला जीव, तुमच्यावर केलेला विश्वास आणि प्रेम सगळं अगदी खरं आणि जेन्यूईन होतं. पण तुमचे येणारे असंख्य कॉल्स मला स्टेबल राहू देत नाहीत, ना माझं कामात मन लागतं, ना घरात. मला तुम्ही फोनवर इतकं रडवता, विचारही करत नाही की, ही हॉस्पिटलला असेल, आजूबाजूला लोकं असतील. माझ्या इज्जतीशी तुम्हाला घेणंदेणंच नाही. कामात असताना किंवा फोन बिझी असताना कंटिन्यू कॉल करत मला जाब विचारला जातोय.
माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो, आता तुला पाहायला असं सांगतात. म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे ते लगेच दिसतो. मी कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेय, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाहीये का, असं बोलून त्रास दिला.
माहेरच्यांना काहीपण बोलतात. फर्निचरच्या पैश्यावरुन भांडलात. जेव्हा मला नीट पीजी द्यायची होती, तेव्हा अभ्यास करू दिला नाही. स्वतःही केला नाही. मी केलेल्या चुका मला रोज ऐकवून माझी मेंटल हरॅशमेंट केली तुम्ही. कामात असताना कॉल उचलला नाही म्हणून रागावतात, नंतर बोलते म्हटल्यातर पण चिडतात. हे स्वतः आज समाधान भाऊ समोर झालं. मला दिलेला त्रास घरी सांगितला, तर आपलं नातं तुटेल या धमकीने मला नेहमी शांत बसवलं.
माझ्याकडून आता सहन होत नाही हो. एवढा जीव लावून तुमच्या घरच्यांना जीव लावून तुम्ही माझ्याविषयी खूप वाईट गोष्टी पेरल्या. मी त्यांना मनापासून जपलं. सासू-सासऱ्यांची काळजी घेतली. कधी उलट- सुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं. मला ते फार वाईट वाटलं, म्हणून मी काल देवाला जातांना मम्मी- पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं. माझ्यात अन् प्रिया दीदीत वाद घालून दिले.
माझा मोबाईल तुमच्यासाठी नेहमी ओपन राहिला. तुमचे फिंगरप्रिंट त्यावर जोडलेले आहेत. तुमच्यावर मी लग्नाअगोदरचा पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आई-वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. त्यावर तुमचा काहीच अधिकार नव्हता. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आई-वडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनॉकॉलॉजिस्ट व्हायचे होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेन, माझ्या आई-वडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात त्यांना (सासू-सासऱ्यांना) नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड नका करत जाऊ. आय लव्ह यू सो मच, बाय. यू आर ए फ्री नाऊ.
तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. मी मेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर, हुंडा देणारी बायको भेटेल, घराला सून मिळेल. पण माझ्या मम्मी-पप्पाला मुलगी आणि भावाला बहीण नाही भेटणार. आता पसतावा करु नका. खुशीने जागा. तुमचं डोकेदुखी नेहमीसाठी जातेय. बाय अहो, आय वुईल मिस यू ए लॉट. माझी कदर नाही केली. दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा.
माझे मम्मी पप्पा आणि कुणाल, तुम्हाला तर आयडीया पण नाही की, मी असा काही निर्णय घेईल ते. पण तुम्हाला दिसला नाही मला दिलेला त्रास. सॉरी मम्मी-पप्पा, सॉरी कुणाल. पण नाही जगावं वाटत रे असा चारित्र्याच्या धब्बा घेऊन. माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे.
तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि हा पप्पा, ते त्यांच्या पोराला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील. त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील, तुम्ही नका लढू. खुशीने तुम्ही फक्त जगा. माझा न्याय मी स्वतः स्वामींकडून घेईन. एकमेकांना सांभाळा. कुणालचं लग्न मस्त करा. मी असेन तुमच्यासोबत नेहमी. संतोषभाऊ आणि गजूभाऊ, मम्मी पप्पांकडे लक्ष दया प्लीज. तुम्ही दोघे सख्या भावांसारखे माझ्या पाठिशी उभे राहिले. थॅन्क्स यू, लव्ह यू ऑल. मला माफ करा.











