रत्नागिरी : महान्यूज लाईव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मधील उमराठ जिल्हा परिषदेत शाळेतील ही घटना. या शाळेत चक्क बिबट्याचं पिल्लू शाळेतल्या एका पोराने शाळेत आणलं आणि दिवसभर शाळेतली सगळी पोरं त्याच्याबरोबर खेळली. नशीब बिबट्याची मादी तिच्या पोराला शोधत शाळेत आली नाही, म्हणून..
गुहागर मधील उमराठ जिल्हा परिषद शाळेत एका विद्यार्थ्याने हे बिबट्याचे पिल्लू शाळेत आणले. शिक्षकांच्या समोर हे विद्यार्थी या पिल्लाला अंगावर खेळवत असताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे बिबट्याचे पिल्लू आहे हे मुलांना माहित नव्हतं की, माहीत असतानाही मुलं खेळत होती, यावरून देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाळेतील एका विद्यार्थ्याच्या घराच्या पडवीत हे पिल्लू दिसून आलं. ते पिल्लू तसेच घेऊन शाळेतील मुलगा शाळेत घेऊन आला आणि शाळेतील मित्रांना आणि शिक्षकांना त्याने हे पिल्लू दाखवलं. सगळीच मुलं त्याच्याबरोबर खेळू लागली. एकंदरीत गावात बिबट्याचा वावर वाढला आहे, हे मात्र अद्यापही त्या शाळेतल्या मुलांच्या आणि कुटुंबांच्याही लक्षात आले नसल्याचे यातून लक्षात आले.











