संतोष सुमन विठ्ठल शेंडकर, सोमेश्वरनगर
माझ्या विश्वगुरू देशातल्या माणसांना
‘लास्ट स्टेज’चा आजार जडलाय
‘खाबुगिरी’चा आजार!
आधी माणसं पिठलं-भाकरी हाणायची
काही पोळी-भाजी खायची
कुणी नळ्या फुंकायची तर
कुणी आळूचं फदफदं प्यायची
अलिकडं माणसं पैशे खायला सोकावलीत
कुणी हप्ता; कुणी लाच खातं
कुणी टक्केवारीचा मलिदा खातं
तर कुणी मढ्यावरचं लोणी!
कुणी गरिबांची चिक्की खातं
कुणी पोरांच्या गणवेशावर जगतं
कुणी पोषण आहार जिरवतं
तर कुणी पोर्शे कारची लाच हाणतं!
बॉण्ड, राफेल, चारा, भूखंड
असे मोठ्ठे मोठ्ठे घास घेता घेता
लाडक्या उद्योगपतीला सरकारी कंपन्यांचा घास भरवतात..
काहीजण अख्खे साखर कारखानेच गिळून टाकतात
खेळात, शिक्षणात, आरोग्यात, पुलात, रस्त्यात, खुनात-आत्महत्येत…
एवढंच काय सातबाऱ्यात, वारसनोंदीत…
कशातही बिनदिक्कत जनावरासारखं चरतात!
खाता नाहीच आलं काही तर
कुणी चहापाणी मागतं
कुणी दारू
कुणी फॉरेनचे दौरे मागतं
कुणी पाखरू!
कुणी मेंदू खातं
कुणी अब्रू!!
जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती असलेली माणसं
डावीकडून उजव्यापर्यंत
लाळ गळेस्तोवर
पोट फुटेस्तोवर साली
आन सोडून माती खात्यात!
अगदीच सवयीचं झालंय…
ओंगळवाणं राजकारण अंगवळणी पडलंय…
हल्ली म्हणे माणसं आणखी प्रगत झालीत
शेण चिवडू चिवडू शेंगदाणे खाऊ लागलीत
माझ्या राजाचा पुतळा कोसळला तेव्हा जाणवलं
माणसं चक्क विष्ठा खाऊ लागलीत…











