पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यामध्ये लेडी सिंघम अशी ओळख निर्माण करून प्रत्यक्षात गैरव्यवहार करणाऱ्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के हिच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त निखिल नंदकुमार पिंगळे यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली. त्यावरून भाग्यश्री नवटक्के हिच्यावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार 120 ब 166,167, 177, 193, 201, 34, 203, 219, 220, 466 व 474 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलिसांमधील खाऊगिरी किती भयानक वरपर्यंत पोहोचली आहे याचाच प्रचिती देणारी ही घटना आहे. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी, भाईचंद हिराचंद राईसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संदर्भात नोव्हेंबर 2020 मध्ये पुणे जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुनील देवकीनंदन झंवर व कुणाल शहा यांनी तक्रारी अर्ज दिला होता.
यामध्ये नवटक्के यांनी एकाच दिवशी तात्काळ एकापाठोपाठ तीन गुन्हे दाखल केले होते, अशी तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे शेखर सोनाळकर व स्वाती कैलास साईनकर यांना आरोपी करण्यात आले नाही, अशा स्वरूपाची तक्रार दाखल केली होती.
त्यावरून चौकशीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने अभिप्राय मागितला होता. त्यावरून पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 8 मे 2024 व 19 जून 2024 रोजी तर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी 12 ऑगस्ट 2024 रोजी पत्र दिली होती, तर तत्कालीन पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी 9 मे 2024 व 2 जुलै 2024 रोजी पत्र दिली होती.
दरम्यान या तपासामध्ये भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या या तपासावर साशंकता निर्माण होत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यावरून भाग्यश्री नवटाके हिच्याकडे देखील खुलासा मागितला होता, मात्र या एकूण प्रकरणांमध्ये भाग्यश्री नवटक्के व इतरांनी कट रचून तीन ठिकाणी एकापाठोपाठ एक अशा 24 तासाच्या आत तीन गुन्हे दाखल केले, त्यामध्ये फिर्यादी समक्ष हजर नसतानाही गुन्हे दाखल केले व तीन कोटी रुपयांपेक्षाही कमी फसवणूक रकमेचे हे गुन्हे असताना सदर गुन्ह्याचा तपास प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब न करता आर्थिक गुन्हे शारीकडे पाठवला तसेच पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर जाऊन एकाच ठिकाणी संयुक्त पथके पाठवून छापा कारवाई केली असे दिसून आले.
पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण या पोलीस घटकात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये हस्तक्षेप व दबाव टाकून आवाजवीरितीने गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. गुन्हे दाखल करण्यापूर्वी तक्रारदार हे जाणीवपूर्वक विशेष करून पुणे व परिसरातीलच घेण्यात आले. या प्रकरणात निवडक आरोपी करणे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी दाखवणे, हितसंबंधित व्यक्तीला विशेष सरकारी अभियोग्यता म्हणून नियुक्त करणे, गंभीर पुराव्याबद्दल हेतू पुरस्सर दुर्लक्ष करणे, कार्यालयीन टिपणीचा खोटेपणा करणे अशा प्रकारचे वेगवेगळे कृत्य केल्याचे निष्पन्न होत असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपायुक्त विवेक मासाळ करत आहेत.











