इंदापूर : महान्यूज लाईव्ह
रजेच्या बाबतीत वाद झाल्याने रजेचा अर्ज मंजूर करण्याच्या वादात इंदापूरच्या बस आगारातील पाळीप्रमुखाने थेट आगार व्यवस्थापकाच्या डोक्यातच खुर्ची घातली तुला खल्लास करतो असे म्हणत झालेला हा वाद आगार प्रमुखासाठी गंभीर दुखापतीचा ठरला.
या प्रकाराने इंदापूर शहरात खळबळ उडाली. दरम्यान यावरून आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ रामचंद्र जाधव (रा. माळेगाव ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी ही घटना घडली आगारप्रमुख हनुमंत गोसावी व पाळी प्रमुख गोकुळ जाधव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. गोकुळ जाधव ने माझा रजेचा अर्ज मंजूर करा अशी मागणी गोसावी यांच्याकडे केली. त्यावेळी गोसावी हे वाहतूक नियंत्रक निवृत्ती घनवट व लिपिक तौसिफ शेख यांच्यासोबत दररोजची आढावा बैठक घेत होते. त्यामुळे गोसावी यांनी मीटिंग झाल्यानंतर या असे म्हटल्याने जाधवला राग आला.
आत्तापर्यंत तू मला खूप त्रास दिला आहे, माझे वाटोळे केले आहे, तुला बघूनच घेतो, तुला खल्लास करतो असे म्हणत आगार व्यवस्थापकाच्या कक्षातील खुर्ची उचलली आणि रागात गोसावीच्या डोक्यात घातली. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी गोसावींची सोडवणूक केली. यानंतर गोसावींनी इंदापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











